होमपेज › Ahamadnagar › शाळा अंगणवाड्यांसाठी 32 कोटींचा निधी

शाळा अंगणवाड्यांसाठी 32 कोटींचा निधी

Published On: Feb 14 2018 2:49AM | Last Updated: Feb 13 2018 11:50PMनगर : प्रतिनिधी

जिल्हा वार्षिक योजनेसाठी प्राप्त झालेल्या 30 टक्के निधीतून जिल्हा परिषदेसाठी 32 कोटी 63 लाखांचा निधी देण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री राम शिंदे यांनी केली. जिल्हा परिषदेच्या धोकदायक शाळा खोल्यांचे बांधकाम, अंगणवाड्यांचे बांधकाम, अंगणवाड्यांसाठी शौचालयांची उभारणी व शाळांच्या परिसरात असलेल्या विद्युतवाहिन्यांच्या स्तलांतरणासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. 30 टक्केच्या निधीतून 71 कोटींची अपेक्षा असतांना तुलनेत अर्धाच निधी जिल्हा परिषदेला देण्यात आला आहे.

शेतकरी कर्जमाफी व राज्य शासनाची वाढत चाललेली वित्तीय तूट या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हा नियोजन समितीच्या निधीत कपातीचे धोरण स्वीकारले होते. याचा सर्वाधिक फटका जिल्हा परिषदेला बसला होता. नियोजन समितीने कपात करण्यात येणारा निधी हा जिल्हा परिषदेच्या हिश्श्यातून कपात करण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा परिषदेला अपेक्षेच्या तुलनेत अर्धाच निधी मिळाल्याने यावरूनही आगामी काळात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

यामुळे जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणार्‍या विकासकामांना निधी अपुरा होता. अनेक विकासकामांना यामुळे कात्री लावावी लागली होती. जिल्हा वार्षिक योजनेत राज्य शासनाने सुरुवातीला 70 टक्के निधीच खर्च करण्याची मर्यादा दिली होती. मात्र, नुकतेच राज्य शासनाने उर्वरित 30 टक्के निधीही सर्वसाधारण योजनेत उपलब्ध करुन दिला आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी या निधीचे समायोजन करताना उपलब्ध झालेल्या 74. 59 कोटी रुपयांपैकी जिल्हा परिषदेला 32 कोटी 63 लाख इतका निधी उपलब्ध करुन दिला आहे.
विभागांच्या मागण्या आणि कामांचे स्वरुप लक्षात घेत सर्वोच्च प्राथमिकता ही प्राथमिक शाळा खोली बांधकाम कामासाठी दिली.

निंबोडी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांच्या वर्ग खोल्यांची तपासणी करण्यात आली होती. जिल्ह्यात तेराशे नवीन वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. सन 2017-18 साठी शाळा खोली बांधकामासाठी 3 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद मंजूर असून, पुनर्विनियोजनाद्वारे 75 लाख रुपये जास्त दिले आहेत. नावीन्यपूर्ण योजनेत विशेष बाब म्हणून 3 कोटी रुपये पुनर्विनियोजनाद्वारे शाळा खोली बांधकामासाठी जादा उपलब्ध होणार आहेत. यामुळे धोकादायक असलेल्या शाळा खोल्यांची दुरुस्ती शक्य होणार आहे.

याशिवाय, जिल्ह्यातील 4 हजार 801 अंगणवाड्यांपैकी 1 हजार 70 अंगणवाड्यांना इमारत उपलब्ध नाही. तसेच जुन्या अंगणवाड्यांची दुरुस्तीही अत्यावश्यक आहे. सध्या एकूण अंगणवाड्यांपैकी 1 हजार 374 अंगणवाड्यांना शौचालय नाही. सन 2017-18 च्या योजनेत अंगणवाडींसाठी 9 कोटींची तरतूद उपलब्ध आहे. आता अंगणवाडी इमारत बांधकाम, दुरुस्ती आणि शौचालय यासाठी विशेष बाब म्हणून नावीन्यपूर्ण योजनेतील 2 कोटी रुपयांची तरतूद पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 72 जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या आवारातील विद्युत वाहिन्यांच्या स्थलांतरणासाठी विशेष बाब म्हणून 78 लाख 69 हजार रुपये मिळणार आहे.