होमपेज › Ahamadnagar › तुम जियो हजारो साल.. साल के दिन हो पचास हजार

तुम जियो हजारो साल.. साल के दिन हो पचास हजार

Published On: Jan 23 2018 1:18AM | Last Updated: Jan 22 2018 11:39PMनगर : विशेष प्रतिनिधी

‘तुम जियो हजारो साल.. साल के दिन हो पचास हजार’ अशा आदरयुक्त भावनेतून रविवारी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा अमृत वर्षाव केला. ‘राजकारणाच्या वाटेवर काटेच अंथरलेले होते, पण तेच जीवनाचे अंतिम ध्येय मानून मी चालत राहिलो. खार्‍या पाण्याच्या समुद्राला गोड करण्यासाठी जशा नद्या अजूनही समुद्राला येऊन मिळतात, याच भावनेतून सध्याचं राजकारण ‘गोड’ करण्यासाठी विविध क्षेत्रातील तरूण, विद्वान, साहित्यिक, विचारवंत आणि माध्यमांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा यशवंतराव गडाख यांनी यावेळी व्यक्त केली. बोलण्याच्या ओघात, ‘झाडावरची पिवळी पानं नकळत गळून पडतात, तसं आमच्याही पिढीचं होईल, पण या पिढीने आखून दिलेल्या मार्गावरून पुढे जा.. यश मिळवा’, असं आवाहन त्यांनी केलं तेव्हा उपस्थित जनसमुदाय अक्षरश: हेलावून गेला.

ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या वयाच्या पंचाहत्तरीनिमित्त सोनई (ता. नेवासा) येथे आयोजित कार्यक्रमात अविट गोडीचा कार्यक्रम रंगला होता. जुनी आणि नवी पिढी एकत्र पहायला मिळत होती. ज्येष्ठांची वडिलकी आणि तरुणांची कर्तबगारी, असा सुरेख संगम या कार्यक्रमात होता. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे, व कवी ना. धों. महानोर यांना यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे पुरस्कार यशवंतराव गडाख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना हजारे म्हणाले की, यशवंतराव गडाख यांच्या जीवनात त्यांच्यावर कोणताही डाग लागलेला नाही. सर्वसामान्य आणि गरिबाला केंद्रस्थानी मानून त्यांनी आजवरचे राजकारण केले. राजकारणात समाजकारण, साहित्यातून समाज परिवर्तन करण्याचा गडाख यांचा प्रयत्न राहिला आहे. गडाख यांच्या कामातून अनेकांना दिशा मिळाल्याचेही हजारे यांनी सांगितले.

गडाख म्हणाले, पांढरपेशांनी राजकारण आणि नेत्यांना बदनाम केले आहे. मात्र, आजवर राजकीय नेत्यांच्याच निर्णयांमुळे प्रगती झाली. सुसंस्कारित व सुशिक्षित तरुण राजकारणात आल्यास हे चित्र बदलेल. सध्या शहाणे गोंधळलेले आणि मूर्ख माणसे ठाम आहेत. एकमेकांना पाण्यात पाहणे योग्य नाही. मी देखील गेल्या 50 वर्षांत कोणालाही पाण्यात पाहिलेले नाही. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, उदय निरगुडकर यांनी मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमास साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाठारे, दिग्दर्शक नागराज मंजूळे, मसापचे अध्यक्ष मिलिंद जोशी, खजिनदार सुनीताराजे पवार, अभिनेते रमेश भाटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.