Fri, Apr 26, 2019 01:23होमपेज › Ahamadnagar › ..अन्यथा आंदोलनात सहभागी होणार!

..अन्यथा आंदोलनात सहभागी होणार!

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 10:33PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

महानगरपालिकेने केलेल्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे न्यायालयाने शहरातील मंदिरे हटविण्याची कारवाई केली. मनपाने केलेली कारवाई चुकीची असून, फेरसर्वेक्षणाद्वारे योग्य कारवाई न केल्यास मंदिर बचाव कृती समितीच्या आंदोलनात स्वतः सहभागी होण्यार असल्याचे आश्‍वासन माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिले. खडसे नगरला आले असता त्यांची मंदिर बचाओ कृती समितीच्या सदस्यांनी विश्रामगृहावर भेट घेतली. शहरात मनपाच्या माध्यमातून मंदिरांवर होत असलेल्या चुकीची कारवाई थांबण्यासाठी लक्ष घालावे असे निवेदन समितीचे निमंत्रक वसंत लोढा, सुहास मुळे, बापू ठाणगे आदिंनी दिले.

खडसे म्हणाले की, मंदिर बचाओ कृती समितीच्यावतीने शहरात सुरु असलेले काम माझ्या कानावर आले आहे. समितीच्या सदस्यांनी उपोषण केले होते तेव्हाही मी मध्यस्थी केली होती. ही कारवाई सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार होत आहे. त्यात कोणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. मात्र महानगरपालिकेने केलेल्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे चुकीची कारवाई नगर शहरात चालू आहे. प्रत्यक्षात धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यासाठी प्रत्तेक जिल्ह्यात प्रशासकीय समिती गठन केली आहे. 

या समितीला सामोपचाराने धार्मिक स्थळे इतरत्र दुसर्‍या जागेत स्थलांतरित करण्याचा अधिकारही दिला आहे. मी स्व:ता पुढाकार घेत जळगाव व इतर काही ठिकाणचे धार्मिक स्थळे कोणताही वाद न होता स्थलांतरित केले आहेत. मात्र नगरमधील प्रशासनाने अधिकाराचा गैरवापर करत वाहतुकीस अडथळा नसलेल्या मंदिरे पडली आहेत. त्यामुळे हिंदू भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. आता मी या मंदिर बचाओ कृती समिती बरोबर आहे. जर प्रशासनाने नियमा प्रमाणे जर कारवाई केली नाहीतर मी स्वतः या आंदोलानात सहभागी होणार आहे.