Fri, Apr 26, 2019 19:21होमपेज › Ahamadnagar › अनियंत्रित हिंदुत्ववाद्यांची झळ सवर्ण हिंदूंना : आंबेडकर

अनियंत्रित हिंदुत्ववाद्यांची झळ सवर्ण हिंदूंना : आंबेडकर

Published On: Jan 29 2018 1:44AM | Last Updated: Jan 29 2018 1:43AMनगर : प्रतिनिधी

सध्या हिंदू संघटनांमध्ये वर्चस्ववादातून भांडणे सुरु झाली आहेत. नियंत्रित हिंदू संघटना लोकांच्या म्हणण्याला महत्व तरी देतात. अनियंत्रित हिंदू संघटना बेफाम झाल्या असून, त्याची झळ मुस्लिम, ख्रिश्चन, दलितांना नाही तर सवर्ण मध्यमवर्गीय हिंदूंना बसत आहे. सध्या असलेली करणी सेना ही अनियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांची प्रतिनिधी असल्याची प्रतिक्रिया भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक माजी खा. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 

आंबेडकर नगरला आले असता शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले की, ह्या अनियंत्रित संघटनांनी सुरुवातीला मुस्लिम, त्यानंतर ख्रिश्चन नागरिकांना त्रास दिला. त्यावेळी कुणी बोलले नाही. भीमा-कोरेगावला त्यांनी ओबीसी लोकांना टार्गेट केले असता आपण व्यक्त व्हायला लागलो. नुकतेच गुरगावला स्कुल बसवर दगडफेक करण्यात आली. अनियंत्रित संघटनांचे हे भांडण आता सवर्ण मध्यमवर्गीय हिंदूंच्या घरापर्यंत पोहोचले आहे. ह्या संघटना न्यायालयाच्या निर्णयाला महत्व न देता स्वतःचाच निर्णय मानतात. हिंदूंना धार्मिक संघटन हवे असल्यास ते नियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांच्या मार्फत केले जावे. 

भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्र बंद पाळण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ केले. मुख्यमंत्र्यांनी हिम्मत दाखवून करणी सेनेवरही असेच ऑपरेशन करावे. कायदेशीर मार्गाने चालणार्‍यांची एकीकडे दडपशाही होते. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना मारण्याची धकमी देणार्‍यांवर साधी फिर्यादही दाखल होत नाही. भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर मुख्यमंत्री हे उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींशी याबाबत चर्चा करून पाऊले उचलतील अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. या घटनेचा तपास योग्य होत नाही. आरोपी असलेल्या संभाजी भिंडेंना वाचविण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातून दबाव टाकण्यात येत आहे. योग्य तपास न झाल्यास भिडे व पंतप्रधान कार्यालयाचे असलेले ‘कनेक्शन’ पुराव्यासह सादर करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री सरदार पटेलांचं नाव घेतात. स्वातंत्र्यानंतर तुरुंगात असलेल्या आरएसएसच्या नेत्यांना तुरुंगातून बाहेर सोडतांना सरदार पटेल यांनी तिरंगा फडकविणार असल्याचा करार केला. त्यानंतर आरएसएसच्या लोकांना सोडण्यात आले. त्यामुळे आजही आरएसएसच्या लोकांवर संशय घेतला जातो. सन 2014 पूर्वी नागपूरच्या मुख्यालयात कधी तिरंगा फडकविला गेला नाही. आता तर मोहन भागवत स्वतः तिरंगा फडकावत आहेत. लोकांकडून आरएसएसवर होत असलेले आरोप व त्यात झेंडावंदनाची स्वेच्छा की जबरदस्ती याचा खुलासा होणे आवश्यक आहे. भाजप सत्तेत आल्यानंतरच संविधान दुरुस्तीची नव्हे तर बदलाचीच चर्चा सुरु झाल्याचेही आंबेडकर म्हणाले.

पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा

शरद पवार हे भाजप विरोधकांची मोट बांधत असून आपण त्यांच्यासोबत जाणार का? असा सवाल विचारला असता आंबेडकर यांनी पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ते म्हणाले,  विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजपची साथ सोडत असताना भाजपला पाठिंबा राष्ट्रवादीने दिला. राष्ट्रीय राजकारणात चारित्र्य नसेल तर काहीही साध्य करू शकत नाही, असे  त्यांनी सांगितले.