Tue, Apr 23, 2019 13:42होमपेज › Ahamadnagar › तपोवन रस्त्यासाठी  3.30 कोटींचा निधी

तपोवन रस्त्यासाठी  3.30 कोटींचा निधी

Published On: Jan 24 2018 1:23AM | Last Updated: Jan 23 2018 11:13PMनगर : प्रतिनिधी

सावेडी उपनगरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या तपोवन रस्त्याच्या (4.95 किमी) कामाला मान्यता देत त्यासाठी 3.30 कोटींचा निधीही शासनाने मंजूर केला आहे. आ. संग्राम जगताप यांनी प्रस्तावित केलेल्या या कामाचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश करण्यात आला असून काल (दि.23) ग्रामविकास विभागाने निधी मंजुरीबाबत आदेश पारित केले आहेत. मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत शहरी भागातील आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील 5 किलोमीटरचे रस्ते प्रस्तावित करण्याची संधी देण्यात आली होती. पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर शासनाकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सावेडी उपनगरातील भिस्तबाग महाल ते औरंगाबाद रस्ता (3.100 किमी) व बोल्हेगाव रस्ता (2 किमी) या दोनही रस्त्यांची दुरवस्था झालेली असल्याने नगरसेवक संपत बारस्कर, कुमार वाकळे व निखिल वारे यांनी आ. जगताप यांच्याकडे सदरचे रस्ते या योजनेतून समाविष्ट करण्याची मागणी केली होती. आ. जगताप यांनी याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. 28 डिसेंबर रोजी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेने मंजुरीबाबतचे पत्र मनपा आयुक्तांना पाठविले होते. त्यानंतर काल ग्रामविकास विभागाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर केलेल्या कामांना निधी वितरीत केला आहे.

यात औरंगाबाद महामार्ग ते तपोवन रस्ता या 4.95 किमीच्या कामासाठी 3 कोटी 15 लाख 58 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. तर या कामावर पुढील 5 वर्षे देखभालीसाठी 14 लाख रुपयांची तरतूदही शासनाने करुन दिली आहे. ग्रामविकास विभागाने या कामाला प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे लवकरच हा निधी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकडे वर्ग होऊन त्यांच्यामार्फतच हे काम करण्यात येणार आहे. आ. जगताप यांनी प्रस्तावित केलेल्या बोल्हेगाव रस्त्याच्या कामाचा मात्र आदेशात उल्लेख करण्यात आलेला नाही. दरम्यान, तपोवन रस्त्यासाठी 14 व्या वित्तआयोगाचा निधी उसनवारीने वापरण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने मंजूर केला होता. त्याची निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली आहे. मात्र, शासनाने आता या रस्त्यासाठी निधी मंजूर केला असल्याने ‘उसनवारी’चा खेळ संपुष्टात आला आहे.