Tue, Jun 25, 2019 14:02होमपेज › Ahamadnagar › मार्चपासून मिळणार नगरमध्येच पासपोर्ट

मार्चपासून मिळणार नगरमध्येच पासपोर्ट

Published On: Feb 11 2018 12:53AM | Last Updated: Feb 11 2018 12:03AMनगर : प्रतिनिधी

पासपोर्ट करण्यासाठी सातत्याने पुण्याला होणारी नगरकरांची धावपळ आता कमी होणार आहे. नगरमधील प्रधान डाकघराच्या इमारतीत नवीन कार्यालय सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला आसून, मार्चपासून नगरमध्येच पासपोर्ट मिळणार असल्याने नगरकरांची अपेक्षा पूर्ण होणार आहे. यासंदर्भात पुण्यातल्या पासपोर्ट कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी नुकतीच नगरला भेट दिली. परदेशात शिक्षण घेण्यासाठी, व्यवसाय विस्तारीकरणासाठी, पर्यटनासाठी देशातून परदेशात जाणार्‍या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परदेशात जाण्यासाठी संबंधितांकडे पासपोर्ट असणे आवश्यक असते.

नगरकरांना पासपोर्ट काढण्यासाठी पुण्यातील प्रादेशिक पारपत्रक कार्यालयाचा आसरा आहे. मात्र पुण्याला जात पासपोर्ट काढण्यात मोठ्या प्रमाणावर नगरकरांचा वेल व पैसा वाया जातो. अनेकदा त्यासाठी पुण्यातल्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यामुळे अनेक वर्षांपासून नगरला पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याची मागणी सातत्याने होत होती. यासंदर्भात वारंवार निवेदनेही देण्यात आली. केंद्रासह राज्यातही सत्तेच्या गारुडावर विराजमान झालेल्या भाजप सरकारने नागरिकांची होणारी ही गैरसोय टाळण्यासाठी जिल्हास्तरावर पासपोर्ट कार्यालयांना मंजुरी देण्यात आली.

दोन वर्षांपूर्वी घोषणा झाल्यानंतर राज्यातील अहमदनगरसह अन्य ठिकाणी नव्याने पासपोर्ट कार्यालये सुरू करण्याच्या प्रशासकीय हालचालींना वेग आला.  मागील वर्षी नगरला पासपोर्ट कार्यालय जागेच्या पाहणीसाठी पुणे विभागाचे तत्कालीन पारपत्र अधिकारी अतुल गोटसुर्वे, पुणे पोस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्वरकर यांनी संयुक्तरीत्या भेट दिली. यावेळी प्रधान डाकघरच्या इमारतीचा दुसरा मजला हा पारपत्रक कार्यालयासाठी निश्चित करण्यात आला. दरम्यान, 26 मे 2017 रोजी पोस्टल सेवेच्या संचालक सुमित्रा आयोध्या यांनीही भेट देऊन आढावा घेतला. या अनुषंगाने 21 जुलै 2017 रोजी या कार्यालयातील इलेक्ट्रीक व संगणक लॅनची फिटिंग करण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयातून मंजुरी देण्यात आली आहे.सद्यस्थितीत चालू महिन्याच्या अखेरीस अंतर्गत सुसज्जतेचे कामकाज पूर्ण होण्याची शक्यता आहे.