Sat, Jun 06, 2020 09:42होमपेज › Ahamadnagar › आंबिलवाडी शिवारात अपघातात तीन ठार

आंबिलवाडी शिवारात अपघातात तीन ठार

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 11 2017 1:27AM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

नगर-सोलापूर रस्त्यावरील आंबिलवाडी शिवारात मालमोटार व कारचा भीषण अपघात होऊन तीन जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी रात्री 10च्या सुमारास हा अपघात झाला. मयत झालेल्यांमध्ये आत्माराम जयसिंग खरमाळे (30), भैरवनाथ कोंडिबा गायकवाड (32), जालिंदर लक्ष्मण भिलारे (40, तिघे रा. निंबळक, ता. नगर) यांचा समावेश आहे.  महेश कळसे (रा. निंबळक, ता. नगर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारला धडक देणार्‍या मालमोटारीच्या चालकास ताब्यात घेतले आहे. 

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शनिवारी रात्री एका कारमधून चार जण नगरहून सोलापूर रस्त्याने चाललेले होते. नगर-श्रीगोंदा तालुक्यांच्या सीमेवरील आंबिलवाडी (ता. नगर) शिवारात नगरच्या दिशेने भरधाव वेगात येणार्‍या मालमोटारीने कारला जोराची धडक दिली. दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याने कारचा पुढचा भाग चक्काचूर होऊन तीन जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पोहोचण्यापूर्वी मालमोटारीच्या चालकास नागरिकांनी पकडून ठेवले होते. त्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

अपघातानंतर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाल्याने नगर-सोलापूर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यास अडीच-तीन तास लागले. मध्यरात्रीनंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. या अपघाताने निंबळक गावावर शोककळा पसरली. मयतांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर ग्रामस्थांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.