Sun, Nov 18, 2018 18:14होमपेज › Ahamadnagar › छकुलीचा आवाज अजूनही कानात घुमतोय

छकुलीचा आवाज अजूनही कानात घुमतोय

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

‘आरोपींना फाशीची शिक्षा झाली. आता त्यांना फासावर लटकविल्यावरच खरे समाधान होईल. दीड वर्षांपासून दररोज छकुलीची आठवण येते. तिचा आवाज आजही कानात घुमतो’, असे म्हणत पीडितेच्या आईने न्यायालयाच्या आवारात टाहो फोडत अश्रूंना वाट करून दिली.

‘शनिवार आला की, तिचे शब्द कानात घुमतात. आई लवकर उठ. माझी लवकर शाळा आहे. तिच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता, सरकार, तपासी अधिकारी, विशेष सरकारी वकील, भैय्युजी महाराज पाठीशी उभे राहिले म्हणून आज न्याय मिळाला. माझ्या छकुलीचे जे झाले, ते राज्यातील कुठल्याच मुलीचे होऊ नये, एवढीच एक आई म्हणून माझी कळकळीची विनंती आहे. राज्यातील कुठल्याही कुटुंबावर असे संकट कोसळले, तर मी तेथे धावून जाईल’, असे पीडितेची आई प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाली.

पीडितेचा भाऊ म्हणाला की, ‘आरोपींना फाशीची शिक्षा झाली, पण बहीण परत मिळणार नाही. ही वेळ भविष्यात कोणत्याच कुटुंबावर येऊ नये. आरोपींना सुनावलेल्या शिक्षेची लवकर अंमलबजावणी करण्यात यावी.’ गुन्ह्यातील फिर्यादी व पीडितेचा चुलतभाऊ म्हणाला की, ‘निकालामुळे आमचे समाधान झाले आहे. आरोपींना फाशी देऊन न्यायालयाने छकुलीला न्याय दिला आहे.’