Mon, Jun 24, 2019 21:55होमपेज › Ahamadnagar › निकाल हा मराठ्यांच्या एकजुटीचा विजय

निकाल हा मराठ्यांच्या एकजुटीचा विजय

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

 नगर : केदार भोपे

राज्यभरात लाखोंच्या संख्येने निघालेल्या मराठा क्रांती महामूकमोर्चात ज्याप्रमाणे शिस्तबद्धरित्या नागरिक सहभागी झाले होते, तशाच प्रकारची शिस्त न्यायालयात निकाल ऐकण्यासाठी आलेल्यांनी दाखवून दिली. न्यायालयाने दिलेला निकाल म्हणजे जगभरातील मराठ्यांच्या एकजुटीचा, संघटितपणाचा विजय असल्याची भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली.

ज्या ‘निर्भया’ला न्याय मिळावा, या मागणीसाठी मराठा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, त्याच ‘निर्भया’वर अत्याचार करणार्‍यांना शिक्षा सुनावली जाणार असल्याने राज्यभरातून मराठा मोर्चाचे कार्यकर्ते, समन्वयक नगरला आले होते. न्यायालयाने दोषी ठरविलेले असल्याने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा मिळणार की, फाशीची? एवढीच काय ती उत्सुकता प्रत्येकाच्या मनात दिसून येत होती. सकाळीच निकाल असल्याने राज्याच्या इतर भागातून विविध संघटनांचे कार्यकर्ते रात्रीच नगर मुक्कामी आले होते.

सकाळी थंडीचा प्रचंड कडाका असूनही, बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांची निकालाविषयी असलेली उत्सुकता अजिबात कमी झालेली दिसली नाही. सकाळी सात वाजल्यापासूनच जिल्ह्यासह परजिल्ह्यातून आलेले कार्यकर्ते गटागटाने न्यायालयाच्या परिसरात जमू लागले. ऐतिहासिक अशा खटल्याच्या निकालासाठी प्रत्येकाच्या मनात शिक्षेविषयी उत्सुकता दिसून आली. खटल्याला पूर्णवेळ उपस्थित राहू न शकलेल्या अनेकांनी खटल्याचा शेवट ऐकण्यासाठी तोबा गर्दी केली. न्यायालयाच्या नवीन इमारतीत पहिल्यांदाच या खटल्याच्या शिक्षेसाठी इतक्या मोठ्या संख्येने नागरिक जमले होते. पीडित मुलीच्या नातेवाईकांसह समस्त ‘कोपर्डी’कर निकाल ऐकण्यासाठी थांबून होते. आरोपींनी केलेल्या क्रूर कृत्याविषयी नागरिकांच्या मनात असलेला तीव्र राग शब्दा-शब्दातून व्यक्त होत होता.

सकाळी नऊनंतर न्यायालयाबाहेर गर्दी वाढत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी वकील, न्यायालयाचे कर्मचारी व पत्रकार वगळता इतरांना प्रवेश बंद केला. त्यामुळे इतर कामासाठी न्यायालयात आलेल्यांचे हाल झाले. न्यायालयाचे प्रवेशद्वार बंद केल्याने त्यासमोर मोठी गर्दी झाली होती. पोलिस, वकिलांच्या गाड्या आत येण्यास जागा न राहिल्याने पोलिसांनी सर्वांना प्रवेशद्वारापासून बाजूला थांबण्याची विनंती केली. यावेळीही कुठलाही बेशिस्तपणा न दाखवता सर्वांनी शांततेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहत, रस्त्यावरील गाड्या व रुग्णवाहिकांना रस्ता उपलब्ध करून दिला. त्यामुळे पोलिसांचा भारही कमी झाला.

सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे वाहन न्यायालयात जात असताना त्यांच्या विजयाच्या घोषणा सुरु झाल्या. निकम न्यायदान कक्षात गेल्यानंतर मात्र न्यायालय इमारतीच्या बाहेर शिक्षेविषयी कुजबुज सुरु होती. अनेक जण सोशल मीडियावर निकालाच्या काही अपडेट्स येताहेत का? याची खातरजमा करत होते. न्यायाधीशांनी निकालाचे वाचन सुरु केल्यानंतर बाहेर उपस्थितांनी टाळ्या वाजवत शिक्षेचे स्वागत केले. टाळ्या, शिट्ट्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने न्यायालय परिसर दणाणून गेला.