Thu, Apr 25, 2019 14:07होमपेज › Ahamadnagar › भांडवलदारांची तळी उचलणारे सरकार सत्तेत: भालचंद्र कांगो

भांडवलदारांची तळी उचलणारे सरकार सत्तेत : भालचंद्र कांगो

Published On: Feb 11 2018 12:53AM | Last Updated: Feb 10 2018 11:51PMनगर : प्रतिनिधी

देशामध्ये जातीधर्माच्या नावावर आपसात भांडणे लावून भाजप भांडवलदारांची तळी उचलत आहे. या सरकार उलथून टाका, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. कॉ. भालचंद्र कांगो यांनी केले. भाकपच्या तेविसाव्या जिल्हा पक्ष परिषदेला येथील हमाल पंचायत भवनमध्ये काल (दि.10) प्रारंभ झाला. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.कॉ. कांगो बोलत होते. कॉ. बाबा आरगडे अध्यक्षस्थानी होते. कामगार नेते कॉ. मिलिंद रानडे, भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे, भारतीय महिला फेडरेशनच्या प्रदेशाध्यक्ष कॉ. स्मिता पानसरे, प्रा. डॉ. मेहबूब सय्यद, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, अ‍ॅड.कॉ. बन्सी सातपुते, कॉ. बहिरनाथ वाकळे आदी उपस्थित होते.

कॉ. कांगो म्हणाले, सध्या शेतकरी, कष्टकरी व कामगार वर्गामध्ये या सरकार बद्दल कमालीची अस्वस्थता आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. कामगार देशोधडीला लागले आहेत. अशा परिस्थितीत हे भांडवलशाही सरकार आता सहकार देखील बुडवायला निघाले आहे. त्यामुळे अगामी निवडणुकांकडे मोठ्या गांभीर्याने पाहिले पाहिजे. ‘सहकार बचाव, देश बचाव’ अशी भूमिका घेतली पाहिजे. 

कामगार नेते मिलिंद रानडे म्हणाले, सरकार आणि भांडवलदारांचे कसे साटेलोटे आहे, ही बाब जनतेच्या समोर आणली पाहिजे. संघटनात्मक, वैचारिक आणि धोरणात्मक अशा तिन्ही पातळीवर विचार करून आपल्या विचारांचे  राज्य आणण्यासाठी जागरूक राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य शिवाजीराव देवढे, डॉ. राधेश्याम गुंजाळ, कॉ. मोहन देशमुख, ज्ञानदेव पांडुळे आदी उपस्थित होते. कॉ. सुभाष लांडे यांनी प्रास्ताविक केले.  शांताराम वाळुंज यांनी अहवाल वाचन केले. संतोष खोडदे यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. सुधीर टोकेकर यांनी आभार मानले.