Thu, Jun 27, 2019 09:55होमपेज › Ahamadnagar › व्हॉट्सअ‍ॅपचे सरकारी ग्रुप सोडणार :एकनाथ ढाकणे

व्हॉट्सअ‍ॅपचे सरकारी ग्रुप सोडणार :एकनाथ ढाकणे

Published On: Dec 31 2017 1:30AM | Last Updated: Dec 30 2017 11:27PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

मागील काही काळात स्मार्ट फोनचे प्रस्थ वाढल्याने शासकीय कामकाजातही अधिकारी, कर्मचारी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करू लागले आहेत. यासाठी ग्रुप स्थापन करून ग्रुपवरच प्रशासनाकडून कर्मचार्‍यांना कामांचे नियोजन, आदेश दिले जातात. सरकारी कार्यालयांकडून होणार्‍या व्हॉट्सअ‍ॅपच्या अतिरेकी वापरला ग्रामसेवक वैतागले असून 1 जानेवारी पासून सर्व ग्रामसेवक सरकारी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी केली.

निवेदनात म्हटले आहे की, सरकारी कार्यालयांकडून मोबाईलवरील ग्रुपचा गैरवापर होत आहे. कार्यालयीन वेळेत व्हॉटसअप, स्मार्टफोन वापरु नये असे न्यायालयाने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे शारीरीक आजार, मेंदूचे आजार होत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी व्हॉटसअपचा वापर करून ग्रामसेवकांना रात्री अपरात्री, केव्हाही सतत धमकीवजा आदेश देत असतात. आदेश देताना कायदे, नियम पायदळी तुडवले जातात. याचा ग्रामसेवकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून ब्लड प्रेशर, हृदयरोगाच्या तक्रारी वाढल्या आहेत. यापार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व ग्रामसेवक अशा सरकारी ग्रुपवर बहिष्कार टाकून ग्रुप सोडणार आहेत.

ग्रामसेवक संवर्ग व्हॉट्सअ‍ॅपऐवजी ई मेल व इतर अधिकृत संगणकीय प्रणालीचा वापर करण्यावर भर देणार आहे. याशिवाय एबीएम अ‍ॅप, फोटो अपलोड, कापणी प्रयोग अ‍ॅप, जिओ टॅगिंग इत्यादी कामासाठी ग्रामसेवक स्वत:च्या खासगी मोबाईलवर अ‍ॅप डाऊनलोड करणार नाहीत. सध्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित असून त्यासाठी ग्रामपंचायत कंपनीला दरमहा 12 हजार रुपये देत आहे. त्यामुळे संगणकीय माहिते देणे, ई मेल अशी कामे संबंधित सेवा केंद्राच्या डाटा ऑपरेटरमार्फत करून घेण्यात येतील, असे ढाकणे म्हणाले.