Sat, Aug 17, 2019 16:29होमपेज › Ahamadnagar › मनपाच्या खताला मिळाला ब्रँण्ड

मनपाच्या खताला मिळाला ब्रँण्ड

Published On: Jan 23 2018 1:18AM | Last Updated: Jan 22 2018 11:42PMनगर : प्रतिनिधी

शास्त्रोक्‍त पध्दतीने उभारण्यात आलेल्या व राज्यातील ठराविक खतनिर्मिती प्रकल्पांमध्ये गणल्या जाणर्‍या महापालिकेच्या सावेडी व बुरुडगाव या दोन्ही खत प्रकल्पांच्या दर्जावर शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. या प्रकल्पात तयार होणारे खत कृषि विभागाच्या प्रयोगशाळेने प्रमाणित केल्यामुळे या खताला ‘हरित महासिटी कंपोस्ट’ ब्रँण्डसाठी परवानगी देण्यात आली आहे. विपणन व विक्रीसाठी ही परवानगी देण्यात आल्याचे पत्र स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालक डॉ. उदय टेकाळे यांनी महापालिकेला दिले आहे. राज्यातील खतनिर्मिती प्रकल्पांमधून निर्मिती केलेल्या जाणार्‍या खताचे ‘हरित महासिटी कंपोस्ट’ असे ब्रँडिंग करण्याचा निर्णय राज्य शासनाने मे महिन्यात घेतला होता.

त्यानुसार नगर महापालिकेच्या प्रकल्पाचीही तपासणीसाठी निवड करण्यात आली होती. शासनाच्या समितीने जून महिन्यात बुरुडगाव व सावेडी येथील प्रकल्पांची पाहणी केल्यानंतर तेथील खतांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. कृषि विभागाच्या फर्टिलायझर कंट्रोल लॅबोरेटरीत याची तपासणी होऊन या खतांचा दर्जा प्रमाणित करण्यात आला. खतनिर्मिती प्रकल्पात घनकचरा व्यवस्थापन कायदा 2016 नुसार मनपाने प्रकल्पात कामांना सुरूवात केल्याची तसेच खतनिर्मिती सुरू असल्याची नोंद समितीने यापूर्वीच घेतली होती. त्याची पाहणीही समितीने केल्यानंतर हरित महासिटी कंपोस्टच्या ब्रँडिंगसाठी नगरच्या प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे.

महापालिकेने विलगीकरण केलेल्या विघटनशील कचर्‍यापासून तयार केलेल्या व कृषि विभागाच्या प्रयोगशाळेने एफसीओ मानकानुसार असल्याचे प्रमाणित केल्यानुसार हरित महासिटी कंपोस्ट हा राज्य शासनाचा बँ्रण्ड विपणन व विक्रीसाठी वापरण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे अभियान संचालक डॉ. टेकाळे यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, मे. पी. एच. जाधव या संस्थेमार्फत चालविल्या जाणार्‍या मनपाच्या खतनिर्मिती प्रकल्पात तयार होणार्‍या खताचा दर्जा उत्तम असल्याचे शिक्कामोर्तब शासनाकडूनच झाल्यामुळे राज्यातील अव्वल दर्जाच्या खतप्रकल्पांमध्ये ‘नगर’च्या प्रकल्पाची गणती झाली आहे.