Sat, Apr 20, 2019 16:32होमपेज › Ahamadnagar › अपहरण करून लावले भिकेला

अपहरण करून लावले भिकेला

Published On: Jan 30 2018 1:55AM | Last Updated: Jan 30 2018 1:17AMनगर : प्रतिनिधी

दिव्यांग मुलांचे अपहरण करून त्यांना भिकेला लावणारे नगरमधील रॅकेट उघडकीस आले आहे. परळी वैद्यनाथ येथील 18 वर्षांच्या दिव्यांगास त्याच्या ओळखीच्या व्यक्तीने कोठला परिसरात काल (दि. 29) दुपारी पाहिल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. सदर मुलाची सुटका करण्यात आली. याप्रकरणी तिघांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक जण अल्वपयीन आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांत मोहम्मद कलाम (रा. बिहार, दोघांची नावे एकसारखी) यांचा समावेश आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथील 18 वर्षीय दिव्यांग मुलगा जुबेर मन्सूर शेख याचे 25 जुलै 2017 रोजी राहत्या घरून अपहरण झाले आहे. याबाबत त्याच्या वडिलांनी परळी वैद्यनाथ पोलिस ठाण्यात मिसिंग नोंदविलेली होती.

या घटनेस सहा महिने उलटूनही दिव्यांग जुबेर सापडत नव्हता. सोमवारी (दि. 29) दुपारी दिव्यांग जुबेर याला त्याच्या ओळखीच्या यासीन काकर यांनी कोठला परिसरात भीक मागताना पाहिले. काकर यांनी जुबेरच्या दिशेने धाव घेताच त्याच्या सोबत असलेला एक जण पळून जाऊ लागला. त्यांनी एकास ताब्यात घेतले व जुबेरसह त्यास तोफखाना पोलिस ठाण्यात आणले.  तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी जावेद शेख, दीपक रोहोकले, पिनू गायकवाड, सचिन गायकवाड, कोतकर आदींच्या पथकाने रेल्वे स्टेशनसह शहरातील विविध भागांत शोध घेऊन आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे.

जुबेर याच्याकडे चौकशी केली असता त्याने परळी वैद्यनाथ येथून अपहरण केल्यानंतर राज्यात व कर्नाटकात विविध ठिकाणी नेले. तेथून काही दिवसांपूर्वी पुण्यात आणले. पुण्यात दोन दिवस भिक्षा मागितल्यानंतर चार दिवसांपासून नगरला आणले, असे सांगितले आहे. भिकार्‍यांची टोळी चालविणारा म्होरक्या नगरमधील काही स्थानिक व्यक्तींच्या रॅकेट चालवत असल्याचा संशय आहे. तोफखाना पोलिसांचे पथक रेल्वे स्टेशन परिसरात त्याचा शोध घेत होते. तब्बल सहा महिन्यानंतर अपहरण झालेला जुबेर सापडला आहे. तो सापडताच नातेवाईकांनी त्याच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला.

‘पाण्याऐवजी दारू दिली’

दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी भीक मागून जमा झालेले पैसे म्होरक्या सायंकाळी स्वतःकडे घेत असे. रेल्वे स्टेशन अथवा इतर कुठल्याही ठिकाणी दिसेल, तिथे राहावे लागत होते. पाणी पिण्यासाठी मागितल्यानंतर त्याऐवजी दारू देऊन कायम नशेत ठेवले जात होते, असे जुबेर याने पोलिसांना सांगितले आहे.