Sat, Apr 20, 2019 15:52होमपेज › Ahamadnagar › ठेकेदाराला ‘राष्ट्रवादी’चा वरदहस्त

ठेकेदाराला ‘राष्ट्रवादी’चा वरदहस्त

Published On: Dec 31 2017 1:30AM | Last Updated: Dec 30 2017 11:36PM

बुकमार्क करा
नगर ः प्रतिनिधी

अधिकार्‍यांच्या खोट्या सह्या व अंदाजपत्रक रजिस्टरला नोंद नसतांनाही आणि कामे झालेली नसतांनाही 40 लाखांची बिले काढून मनपाची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. ठेकेदार सचिन लोटके हा ‘राष्ट्रवादी’चा पदाधिकारी असून त्यांच्या नेत्यांच्या वरदहस्तामुळेच हे धाडस ठेकेदाराने केल्याचा आरोप शिवसेनेने पत्रकार परिषदेत केला आहे. या घोटाळ्याबाबत खासगी फिर्याद देणार असल्याचेही शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी सांगितले.

पथदिवे घोटाळ्यावरुन महासभेत झालेल्या गदारोळानंतर आणि विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनीही अधिकार्‍यांच्या निलंबनाची व चौकशीची मागणी केल्यानंतर शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. विकासकामे होत नाहीत म्हणून त्यांचे कार्यकर्ते, नगरसेवक माठ फोडतात आणि दुसरीकडे कामे न करताच त्यांचे पदाधिकारी डल्ला मारतात, असा टोला माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी लगावला आहे. या घोटाळ्यात सचिन लोटके हे ठेकेदार असल्याचे दिसून येत आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनीही याबाबत बिले काढण्यापूर्वीच पत्र दिलेले होते.

त्यानंतरही ही बिले काढण्यात आल्यामुळे या ठेकेदाराच्या मागे ‘राष्ट्रवादी’चा मोठा नेता असावा, अशी शक्यता असून या नेत्यांच्या वरदहस्तामुळेच तर ही बिले निघाली नाहीत ना? असा सवाल सचिन जाधव यांनी उपस्थित केला. या घोटाळ्याच्या मुळापर्यंत जाऊन प्रकरण तडीस नेणार आहोत. दोषी अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार कुणीच यातून सुटणार नाही, असे सांगत शिवसेनाही याबाबत स्वतंत्रपणे सोमवारी फिर्याद देणार असल्याचे दिलीप सातपुते यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने सभागृहात चौकशी आणि निलंबनाच्या केलेल्या मागणीकडे लक्ष वेधल्यानंतर त्यांना या मागणीचा नैतिक अधिकार नाही, या भ्रष्टाचाराविरोधात ‘राष्ट्रवादी’ची भूमिका सभागृहापर्यंतच मर्यादीत आहे का? असा सवाल करुन ते भ्रष्टाचाराच्या विरोधात असतील तर ज्यांच्या प्रभागात कामे झाली, त्या नगरसेवकांनीही स्वतंत्रपणे खासगी फिर्याद द्यावी, असे आव्हान संभाजी कदम यांनी ‘राष्ट्रवादी’ला दिले आहे.