Thu, Jun 27, 2019 09:44होमपेज › Ahamadnagar › कचेरीच्या इमारतीवर आली कर्जमाफीची आफत

कचेरीच्या इमारतीवर आली कर्जमाफीची आफत

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 10:30PM

बुकमार्क करा

नगर ः प्रतिनिधी

  जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन भव्य सहामजली इमारत ऐतिहासिक नगर शहराच्या वैभवात भर टाकणार आहे. या इमारतीचे निव्वळ बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. या इमारतीसाठी पहिल्या टप्प्यातील 28 कोटी रुपयांचा निधी  जवळपास खर्च झाला आहे. ही इमारत परिपूर्ण  होण्यासाठी आणखी 27 कोटी निधीची गरज आहे. शासनाने कर्जमाफीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे राज्यभरातील अनेक विकासकामांना आर्थिक कट लागला आहे. त्यामुळे ही इमारत कर्जमाफीत अडकण्याची शक्यता बळावली आहे.

शहरातील मध्यवस्तीत वसलेली जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत ही ब्रिटिशकालीन असून, सध्या जीर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद रोडवर सहामजली इमारतीचा प्रस्ताव मंजूर करुन घेतला. यासाठी शासनस्तरावर एकूण 57 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता घेतली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 28 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला.  या निधीतून इमारतीचे कॉलम उभारणी, वीटबांधकाम, प्लॅस्टर, फरशी आदी कामे पूर्ण झाली असून, भव्य अशा सहामजली इमारतीचा सांगाडा पूर्ण झाला आहे.

 पूर्वमुखी भव्य इमारत वापरात येण्यासाठी आणखी काही कामे अद्यापि बाकी आहेत. यामध्ये 7 उद्वाहक बसविणे, विद्युतीकरण,अंतर्गत फर्निचर,  इमारती परिसरातील डांबरीकरण, बागबगीचा आणि रंगकाम यासह अंतर्गत विविध अनेक छोटी-मोठी कामांचा समावेश आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने एप्रिल महिन्यात 27 कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. परंतु शासनाने अद्यापि या प्रस्तावाची दखल घेतली नाही. जून महिन्यात शासनाने शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 37 हजार कोटी रुपये लागणार आहे. आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन, शासनाने अनेक विकासकामाला कट लावला आहे. त्यामुळे शासनाकडून या इमारतीसाठी एकरकमी 27 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणे दुरापस्त आहे.