Tue, Mar 26, 2019 23:54होमपेज › Ahamadnagar › बोगस खरेदीखत करुन फसवणूक

बोगस खरेदीखत करुन फसवणूक

Published On: Feb 05 2018 1:59AM | Last Updated: Feb 04 2018 10:47PMनगर : प्रतिनिधी

सावेडीतील सदनिकेचे बोगस खरेदीखत करून 14 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून अजित कदम यांच्यासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 16 जुलै 2016 रोजी पराग बिल्डिंग येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ही खरेदी झाली होती. यातील आरोपी कदम हे राज्यातील एका बड्या राजकीय नेत्याचे नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अजित कृष्णराव कदम (वय 39, रा. कदम वस्ती, गुहा रस्ता, देवळालीप्रवरा, ता. राहुरी), संजय रत्नाकर झिंजे (वय 60, रा. नेहरू मार्केटजवळ, चितळे रस्ता, नगर), गिरीष सुभाष गायकवाड (वय 37, रा. गावडे मळा, सूर्या चौक, गुलमोहोर रस्ता, नगर) यांचा समावेश आहे. 

याप्रकरणी सूर्यकांत रावसाहेब कोल्हे (वय 50, रा. आनंदविहार, स्टेशन रस्ता, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, झिंजे व गायकवाड यांनी कोल्हे यांची अजित कदम यांच्याशी ओळख करून दिली. कदम यांच्या सावेडी येथील जागेत बांधलेल्या महालक्ष्मी वास्तू फेज 2 मधील स्टील्ट फस्ट फ्लोअरमधील निवासी सदनिकेचा कोल्हे यांच्याशी व्यवहार करण्यात आला. या जागेचा सावेडी तलाठी कार्यालयाचा जुना सातबारा उतारा वापरून दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट खरेदीखत केले. या जागेपोटी कोल्हे यांनी 14 लाख 60 हजार रुपये दिले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सूर्यकांत कोल्हे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणात पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश दिला. त्यावरून तिघांविरुद्ध शनिवारी (दि. 3) सायंकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात संगनमताने फसवणूक, अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील हे करीत आहेत.