Sun, Aug 25, 2019 19:42होमपेज › Ahamadnagar › परदेशी पळसमैने चे पक्षमित्रांना आकर्षण

परदेशी पळसमैने चे पक्षमित्रांना आकर्षण

Published On: Jan 23 2018 1:18AM | Last Updated: Jan 22 2018 11:36PMनगर : प्रतिनिधी

जानेवारी महिन्यात विविध पक्षीअभ्यासक संघटनांद्वारे पक्षीगणना भारतभर केली जाते. यावर्षीही ही पक्षीगणना जिल्ह्यात उत्साहाने सुरू झाली असून, पळसमैना या परदेशी पक्षांचे आगमन जिल्ह्यात दरवर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात झाल्याने पक्षीमित्रांमध्ये त्याचे आकर्षण निर्माण झाले आहे. पक्षी अभ्यासक जयराम सातपुते, डॉ.अशोक कराळे, शिवकुमार वाघुंबरे, अनमोल होन व संदीप राठोड यांना ही विशेष बाब लक्षात आली. याबरोबरच विविध प्रकारचे परदेशी बदक, परदेशी करकोचे व हंस जिल्ह्यात ठिकठिकाणी सर्वांचे लक्ष वेधून घेत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

कडक थंडीपासून बचाव करण्यासाठी पळस मैना पूर्व युरोप आणि पश्चिम व मध्य आशियातून हिवाळ्यात स्थलांतर करत जुलै-ऑगस्ट महिन्यात भारतात येतात. भोरडी या नावानेही ओळखल्या जाणार्‍या या पक्ष्याला इंग्रजीतून ‘रोझी स्टरलिंग’ असे नाव आहे. भारतातील वातावरण या पक्षांसाठी पोषक असते. त्यामुळे साधारणत: फेब्रुवारी महिन्यापर्यंत हे पक्षी भारतात राहतात. सायंकाळच्या वेळी आपल्या ठरलेल्या रातथारेच्या जागी हजारोंच्या संख्येने एकत्र येत आकाशात विविध कवायतींसह सुंदर कसरती करणारे पळसमैनांचे दृश्य सर्वांचे मन मोहून घेते.