Mon, Jun 17, 2019 14:26होमपेज › Ahamadnagar › आगे प्रकरणात अ‍ॅड. यादव यांची नियुक्ती 

आगे प्रकरणात अ‍ॅड. यादव यांची नियुक्ती 

Published On: Jan 24 2018 1:23AM | Last Updated: Jan 23 2018 11:24PMनगर : प्रतिनिधी

नितीन आगे खून प्रकरणात उच्च न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधी व न्याय खात्याने सोमवारी (दि. 22) सायंकाळी याबाबतचा आदेश काढला आहे. आगे प्रकरणातील साक्षीदार फितूर झाल्याने सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. त्यानंतर ‘पुढारी’ने ‘न्याय नितीन’चा या वृत्तमालिकेद्वारे नितीन आगे याला न्याय मिळवून देण्यासाठी कोणकोणते कायदेशीर मार्ग आहे, याबाबतचे पर्याय सूचवून घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते. त्यानंतर आगे प्रकरणातील फेरसुनावणीसह विविध मागण्यांसाठी सामाजिक संघटनांनी सरकारी यंत्रणेवर दबाव निर्माण केला होता.

या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल करण्यात आले आहे. त्यात सरकारी पक्षाने या खटल्यातील सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करावा, आरोपींना शिक्षा द्यावी व गरज पडल्यास फेरसुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. खटल्याचे संवेदनशीलता लक्षात घेऊन या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांच्या नियुक्तीची मागणी केली होती. याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विधी व न्याय खात्याच्या प्रधान सचिवांना पत्र दिले होते. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनीही तातडीने तसा प्रस्ताव तयार करून गृह खात्याला पाठविला होता.

गृह खात्याच्या शिफारशीनंतर राज्याच्या विधी व न्याय खात्याने अ‍ॅड. यादव पाटील यांच्या नियुक्तीचा आदेश काढला आहे. यादव हे उच्च न्यायालयात या खटल्याचे कामकाज पाहणार आहेत. सध्या राज्यभरात गाजलेल्या जवखेडे तिहेरी हत्याकांडात ते विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहतात. अ‍ॅड. यादव हे मूळ कोल्हापूर येथील रहिवाशी असून, सध्या मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतात.