Sun, May 26, 2019 00:45होमपेज › Ahamadnagar › महापालिकेची फसवणूक चव्हाट्यावर

महापालिकेची फसवणूक चव्हाट्यावर

Published On: Jan 30 2018 1:55AM | Last Updated: Jan 30 2018 1:12AMनगर  :प्रतिनिधी

महापालिकेतील पथदिवे घोटाळ्याप्रकरणी तब्बल महिनाभरानंतर अखेर काल (दि.29) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुक्‍त घनश्याम मंगळे यांनी स्वतःच महापालिकेची 34.65 लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी फिर्याद दिली असून, या प्रकरणी अभियंता रोहिदास सातपुते, बाळासाहेब सावळे, भरत काळे व ठेकेदार सचिन लोटके या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, गुन्हा दाखल करण्यास होत असलेल्या विलंबाबाबत ‘पुढारी’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर काल वेगाने हालचाली होऊन गुन्हा दाखल झाला. लिपिक भरत काळे यास अटकही करण्यात आली आहे.

29 डिसेंबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी या घोटाळा उघडकीस आणला होता. त्यानंतर महासभेतही या घोटाळ्यावरून मोठा गदारोळ झाला.  त्यानंतर आयुक्‍त मंगळे यांनी नियुक्‍त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालातही मनपाची आर्थिक फसवणूक झाल्याचे व कामात गंभीर अनियमितता झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार तोफखाना पोलिसांत तक्रारही देण्यात आली. मात्र, पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत, गुन्हा दाखल करण्यापूर्वीच चौकशी सुरू केली. पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे व पोलिस नाईक मंगेश खरमाळे, राम सोनवणे यांनी चौकशी पूर्ण करून काल आयुक्‍तांना अहवाल सादर केला. त्यानंतर तात्काळ आयुक्‍त मंगळे यांनी मनपाचे विधिज्ञ अ‍ॅड. मंगेश दिवाणे, अ‍ॅड. तुळशीराम बाबर यांच्या सहकार्याने तोफखाना पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली.

कामे न करताच खोट्या सह्या करून, तसेच कामाची कागदपत्रे गहाळ करून विद्युत विभागाचे अभियंता रोहिदास गजानन सातपुते, पर्यवेक्षक बाळासाहेब चंद्रकांत सावळे, लिपिक भरत त्रंबक काळे व ठेकेदार सचिन सुरेश लोटके यांनी संगनमताने कट रचून 34 लाख 65 हजार 441 रुपयांचा अपहार केल्याची व महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्याचे आयुक्‍तांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी कलम 420, 406, 409, 467, 468, 471, 120 (ब), 201 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. लिपिक काळे यास पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित तिघांच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक सपकाळे यांनी सांगितले. दरम्यान, ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल घेत नगरविकास विभाग व गृह विभागाचे राज्यमंत्री रणजित पाटील यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर वेगाने हालचाली होऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपायुक्‍त, प्रभाग अधिकार्‍यांवर कारवाईचे संकट!

मनपा व पोलिसांच्या चौकशी अहवालात उपायुक्‍त विक्रम दराडे, राजेंद्र चव्हाण यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे. नगरविकास विभागाची परवानगी न मिळाल्याने काल त्यांच्याविरूद्ध फिर्याद देता आली नाही. मात्र, पोलिसांच्या तपासात हे दोघे दोषी आढळल्यास, या दोघांवरही गुन्हा दाखल केला जाईल. जितेंद्र सारसर, नाना गोसावी या दोन्ही प्रभाग अधिकार्‍यांचीही यात चौकशी होणार असल्याचे पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


पाच वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल तपासणार

पथदिवे घोटाळा उघडकीस आल्यानंतर अशाच पद्धतीने यापूर्वीही तरतूद नसलेल्या कामांची बिले अदा झाल्याची व बजेट ‘ओव्हरहेड’ झाल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे. या पार्श्‍वभूमीवर मागील 5 वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल तपासासाठी मनपाकडून मागविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. बजेट रजिस्टरही पोलिसांकडून तपासले जाणार असून, महापालिकेकडून ते मागविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.