Tue, Apr 23, 2019 09:36होमपेज › Ahamadnagar › मराठा आरक्षणासाठी लढा सुरूच राहील

मराठा आरक्षणासाठी लढा सुरूच राहील

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 12:53AMनगर : प्रतिनिधी

मराठा समाजातील तरुण-तरुणींनी व्यवसायाकडे वळावे. त्यांना व्यवसाय शिक्षण व व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहकार्य उपलब्ध व्हावे, या उद्देशातून राज्य सरकारने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान जाहीर केले आहे. याचा लाखो तरुणांना फायदा होणार असल्याने समाजात आनंदाचे वातावरण आहे, असे सांगत मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन लढा सुरूच राहणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. नगर दौर्‍यावर असलेल्या ना. पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधून राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास योजनेची माहिती दिली. या योजनेचे समाजातून स्वागत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

2.88 लाख तरुणांना व्यवसाय शिक्षणासाठी 450 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागील काळात कृषी व्यवसायात तंत्रज्ञानाची अपेक्षित भर पडली नाही. शासनाने 24 प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले असून, यात कृषिविषयक व्यवसायांचाही समावेश आहे.  शिक्षणानंतर तरुणांना 10 लाखांचे कर्ज ‘मुद्रा’मार्फत उपलब्ध करुन दिले जाईल. सहकारी बँकांनीही यासाठी तयारी दर्शविली आहे. या कर्जाचे व्याज सरकार भरणार आहे. महिला बचत गट, भागीदारी व्यवसाय संस्था, खासगी संस्था यांना 50 लाखांपर्यंतचे कर्ज मोठ्या व्यवसायासाठी मिळेल. शेतकर्‍यांचेही गट तयार व्हावेत, अशी सरकारची अपेक्षा असून, त्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळामधून कर्ज उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

रस्ते विकासाबाबत बोलतांना येत्या तीन वर्षांत राज्यामध्ये साडेअडतीस हजार किलोमीटरचे जाळे निर्माण होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. सहापदरी राष्ट्रीय महामार्ग, चारपदरी महामार्ग तसेच महामार्गांना जोडणारे रस्ते विकसित करण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. या रस्त्यांची कामे सुरु झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी दर्जाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करतानाच या कामात खोडा मात्र घालू नका, विरोधकांसह भाजपाच्या लोकप्रतिनिधींनाही समान नियम आहे, त्यांच्यासाठीही ही सूचना आहे, अशा कानपिचक्याही त्यांनी यावेळी दिल्या.

पक्षातील अंतर्गत असंतोषबाबत त्यांना छेडले असता, प्रेमाने सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी पक्ष समर्थ आहे, एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, सरकारमधील अधिकारीच सरकारला कंटाळले असल्याबाबत अजित पवार यांच्या वक्‍तव्याची माहिती नाही, असे सांगून नारायण राणेंबाबत प्रश्‍नच विचारु नका, असे म्हणत या मुद्द्यांवर बोलणेही चंद्रकांत पाटील यांनी टाळले. यावेळी जलसंधारण तथा पालकमंत्री राम शिंदे, खा. दिलीप गांधी, उपमहापौर श्रीपाद छिंदम, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आदी उपस्थित होते.


बोगस प्रकरणांमुळेच कर्जमाफीला विलंब!

कर्जमाफीसाठी 2008-2009 साली 18 महिने लागले होते. त्यातील बोगस कर्ज प्रकरणांमुळेच आताच्या कर्जमाफीला वेळ लागला. मात्र, आम्हाला 18 महिने लागले नाही. 4 महिन्यांतच हा विषय मार्गी लागला आहे. 32 लाख खात्यांमध्ये 19 हजार कोटी रुपये वर्गही झाले आहेत. आणखी 25 लाख खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यासाठी 23 हजार कोटी वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्जमाफीच्या विषयावर बोलण्यासाठी विरोधकांना मुद्दाच राहिलेला नाही, असेही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले.