होमपेज › Ahamadnagar › बजेट रजिस्टर’चा मुद्दा फिर्यादीतून वगळला

बजेट रजिस्टर’चा मुद्दा फिर्यादीतून वगळला

Published On: Jan 30 2018 1:55AM | Last Updated: Jan 30 2018 1:23AM नगर : मयूर मेहता

महापालिकेतील पथदिवे घोटाळ्याप्रकरणी चौकशीचे लांबविण्यात आलेले सोपस्कार तब्बल महिनाभरानंतर पूर्ण झाले. संगनमत करुन व कट रचून ठेकेदार, अधिकारी, कर्मचार्‍यांनी महापालिकेची फसवणूक केल्याची फिर्याद स्वतः आयुक्‍त घनश्याम मंगळे यांनी काल (दि.29) दिली. मात्र, या घोटाळ्याचे मूळ असलेल्या ‘बजेट रजिस्टर’चा फिर्यादीत उल्लेखही नसल्याची माहिती पुढे आली आहे. बजेट रजिस्टरच्या मुद्द्यावर विरोधकांकडून सत्ताधार्‍यांना टार्गेट केले जात असतांनाच फिर्यादीतून हा मुद्दा वगळण्यात आल्यामुळे पुन्हा राजकीय कुरघोड्या रंगण्याची चिन्हे आहेत. प्रभाग 1 व 28 मधील 19 कामांची देयके अदा झाल्यानंतर या कामांना बजेट रजिस्टरमध्ये तरतूद नसल्याचे व ही कामेही झालेली नसल्याचे पुढे आले होते. विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर स्थायी समितीच्या सभागृहात या रजिस्टरची तपासणी झाली.

त्यानंतर चौकशी अधिकारी अतिरिक्‍त आयुक्‍त विलास वालगुडे व संतोष धोंगडे यांनीही सदरची कामे बजेट रजिस्टरमध्ये प्रस्तावित नसल्याचे स्पष्ट केले होते. मनपा अधिनियमानुसार ही गंभीर अनियमितता असली तरी याच आधारवर विकास भार व रेखांकन सुधारणा लेखाशीर्षातून ही लाखोंची देयके झालेली आहेत. त्यामुळे चौकशी अहवाल व पोलिसांच्या तपासात बजेट रजिस्टर हा कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यातच बजेट रजिस्टर ठेवण्याची जागा, त्याचा ताबा यावरुन विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधार्‍यांना वारंवार टार्गेट केलेले आहे. बजेट रजिस्टरमध्ये फेरफार झाल्याचा व त्याच्या तपासणीतून आणखी मोठे घोटाळे उघडकीस येतील, असा आरोपही आ. संग्राम जगताप यांनी केला होता. त्याच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. तर सत्ताधारी शिवसेनेने या प्रकरणातील ठेकेदार राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे सांगत विरोधकांविरोधात रान पेटविले आहे.

घोटाळ्यात आक्षेप असलेल्या कामांना या रजिस्टरमध्ये तरतूद नसल्याने येथूनच घोटाळ्याची सुरुवात असल्याने आयुक्‍तांनी दिलेल्या फिर्यादीत याचा उल्लेख असणे क्रमप्राप्त होते. मात्र, फिर्यादीत केव कामे न करताच देयके अदा केल्याचे व संगनमत करुन, कट करुन महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्याचे म्हटले असल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. याच मुद्द्यावरुन विरोधकांना आयते कोलीत मिळण्याचीही शक्यता असल्याने येत्या काळात सत्ताधारी व विरोधकांमध्ये या मुद्द्यावरुन राजकीय कुरघोड्या रंगण्याची चिन्हे आहेत.