Sat, Mar 23, 2019 12:04होमपेज › Ahamadnagar › ‘झोन’निहाय स्वतंत्र निविदा!

‘झोन’निहाय स्वतंत्र निविदा!

Published On: Dec 26 2017 1:31AM | Last Updated: Dec 25 2017 10:22PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

चारही प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीतील कचरा संकलन व वाहतुकीच्या कामासाठी राबविण्यात आलेली एकत्रित निविदा प्रक्रिया रद्द झाल्यानंतर आता पुन्हा चारही ‘झोन’साठी पुन्हा स्वतंत्र निविदा प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. सावेडी प्रभाग कार्यालय हद्दीसाठी स्वतंत्रपणे राबविण्यात आलेली यापूर्वीची निविदा प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात रद्द करण्यात आली होती. मनपाकडून चुकीची निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याचेही तत्कालीन आयुक्‍तांनी मान्य केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा स्वतंत्रपणे चार निविदा प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

घनकचरा संकलन व वाहतुकीचे काम खासगीकरणातून करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रक्रिया सुरु आहे. महासभेने चारही प्रभाग कार्यालयाच्या हद्दीसाठी ही निविदा प्रक्रिया राबविण्याचा ठराव केलेला होता. त्यानंतर केवळ सावेडी प्रभाग कार्यालयासाठीच निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. तांत्रिक लिफाफ्यांची छाननी होऊन व्यापारी लिफाफेही उघडण्यात आले. ठेकेदाराशी वाटाघाटीही करण्यात आल्या. मात्र, तत्कालीन आयुक्‍त विलास ढगे यांनी महासभेच्या ठरावाकडे लक्ष वेधत सदरची प्रक्रियाच रद्द केली होती. त्यानंतर महासभेच्या ठरावानुसार चारही प्रभाग समिती कार्यालयांसाठी एकत्रित निविदा प्रसिध्द करण्यात आली.

तीन-चार वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्यानंतरही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. काही काळानंतर आयुक्‍त दिलीप गावडे यांच्या काळात पुन्हा एकदा निविदा प्रसिध्द करण्यात आली. त्यात चार संस्थांकडून निविदा प्राप्त झाल्या होत्या. मात्र, तत्कालीन पदाधिकार्‍यांच्या मर्जीतल्या ठेकेदाराला निविदा मिळणार नसल्याचे उघड झाल्यानंतर ठेकेदाराकडून प्रस्तावित करण्यात आलेला खर्च अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे कारण देत प्रशासनाने सदरची प्रक्रिया रद्द केली. काही कालावधीनंतर आणखी एकदा निविदा प्रसिध्द करण्यात आली. त्यात घनकचरा व्यवस्थापन शुल्काची वसुली संबंधित ठेकेदारानेच करण्याची अट घालण्यात आली. मात्र, या मुद्द्यावरुन संभ्रम निर्माण झाला. ठेकेदारांनीही याला आक्षेप घेतल्यानंतर महापौर सुरेखा कदम यांनी या संदर्भात बैठक घेऊन सदरची अट शिथिल करण्याचे व घनकचरा व्यवस्थापन शुल्काची वसुली पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्याचे आदेश दिले. 

आता पुन्हा एकदा चारही झोनसाठी निविदा प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. मात्र, यावेळी एकच निविदा प्रसिध्द न करता चार वेगवेगळ्या निविदा प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. त्यातून प्रत्येक प्रभाग कार्यालयाच्या हद्दीसाठी स्वतंत्र ठेकेदार असावा, अशी अपेक्षा महापालिकेला असली तरी महासभेच्या तत्कालीन ठरावाकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन विभागाचा भोंगळ कारभार व सक्षम ठेकेदार संस्थांच्या मनावर बिंबविली जाणारी मनपाची मलिन प्रतिमा, यामुळे ही निविदा प्रक्रिया विनाअडथळा पूर्ण होऊन कचरा संकलनाचे काम खासगीकरणातून सुरु होईल का? असा सवाल उपस्थित होत आहे.