होमपेज › Ahamadnagar › विहिरीत ढकलून युवकाचा केला खून

विहिरीत ढकलून युवकाचा केला खून

Published On: Dec 17 2017 1:31AM | Last Updated: Dec 16 2017 11:59PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

खुनातील संशय व जमीन विक्रीतील पैशाच्या वादातून युवकास दारू पाजून विहिरीत ढकलून देऊन पाण्यात बुडवून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चिचोंडी पाटील येथे 28 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेबाबत सुरुवातीला नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु, मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी (दि. 15) रात्री खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अंबादास बबन कोकाटे, विठ्ठल सर्जेराव ठोंबरे (दोघे रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना काल (दि. 16) दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 20 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या गुन्ह्यातील आरोपी तात्या रामराव पवार, अण्णा बापू पांडुळे, झांबरे (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. चिचोंडी पाटील) हे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. 

संदीप गजानन गायकवाड (वय 27, रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) हे मयत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती की, आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून बाळू लाटे खून प्रकरणात संदीप गायकवाड यांचा संशय असल्याचा व जमीन विक्रीचे 10 हजार रुपये देण्याबाबत वाद घातला. गायकवाड यांना दारू पाजून कट कारस्थान रचून विहिरीत ढकलून दिले. पाण्यात बुडून गायकवाड यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. 

अकस्मात मृत्यूचा तपास सुरू असताना मयताचा भाऊ श्रीकांत गजानन गायकवाड (वय 20) यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात खून केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी हे करीत आहेत. या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करून शनिवारी दुपारी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. न्यायालयाने खुनाच्या तपासासाठी दोघांना 20 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.