Thu, Jun 27, 2019 03:55होमपेज › Ahamadnagar › टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढू लागली

टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढू लागली

Published On: Sep 03 2018 1:38AM | Last Updated: Sep 03 2018 12:56AMनगर : प्रतिनिधी

पावसाळा सुरु होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला.  परंतु अद्यापि भूगर्भातील पाणीपातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे संगमनेर, पारनेर तालुक्यांच्या पाठोपाठ आता पाथर्डी व नगर तालुक्यांतील काही गावांना पाणीटचाईच्या झळा बसल्या आहेत. पाथर्डी तालुक्यातील 12 व नगर तालुक्यातील भोयरेपठार येथील जनतेच्या घशाला कोरड पडली आहे. त्यामुळे पाथर्डी तालुक्यासाठी 12 तर नगर तालुक्यात एक टँकरला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार ऐन पावसाळयात जिल्हाभरात एकूण 35 टँकर धावत आहेत.   

गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली होती. यंदा मात्र फक्‍त 60 टक्के पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद समाधानकारक वाटत असली तरी, पावसाचे पाणी जमिनीत मुरलेले दिसत नाही. गेल्या तीन महिन्यांत सर्वदूर पावसाची मुसळधार दिसली नाही. यंदाच्या पावसाने ओढेे, नाले, ओहोळ वाहिलेच गेले नाहीत. त्यामुळे भूजलपातळीत अद्यापि म्हणावी अशी वाढ झाली नाही. 

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवडयापासून  संगमनेर तालुक्यातील 16 गावे आणि 63 वाड्यांतील 40 हजार जनतेला 19 टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु आहे. पारनेर तालुक्यातील 4 गावे आणि 16 वाड्यांना देखील 3 टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस होईल आणि या दोन तालुक्यांतील टँकर बंद होतील, अशी आशा होती. परंतु ऑगस्ट महिन्यात एक -दोन पावसाची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यातच पाथर्डी तालुक्यातील चितळवाडी, अकोला, लोहसर, गिरेवाडी, मोहज देवढे, पत्र्याचा तांडा, तीनखडी, शिरापूर, निपाणी जळगाव, पिंपळगव्हाण, मालेवाडी तसेच शेवगाव तालुक्यातील राक्षी अशा एकूण 12 गावांत पाणीटंचाई निर्माण झाली. या गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जावा, असा प्रस्ताव तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी  13 ऑगस्ट रोजी दाखल केला होता. याच कालावधीत नगर तालुक्यातील भोयरे पठार या गावात देखील टँकरची मागणी केली गेली होती. 

जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपापूर्वीच पाथर्डी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी 12 तर नगर तालुक्यासाठी एक टँकर सुरु करण्यास हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे आजमितीस संगमनेर तालुक्यात 19, पारनेर तालुक्यात 3, नगर तालुक्यात 1 तर पाथर्डी तालुक्यात 12 असे एकूण 35 टँकर ऐन पावसाळ्यात धावत आहेत.