Tue, Jun 25, 2019 21:35होमपेज › Ahamadnagar › दोन बँकांच्या चौकशीचे आदेश!

दोन बँकांच्या चौकशीचे आदेश!

Published On: Dec 19 2017 1:55AM | Last Updated: Dec 18 2017 11:20PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

नियमबाह्य कर्जवाटप, एकरकमी कर्जफेड व बोगस कर्ज प्रकरणांबाबत शहरातील दोन सहकारी बँकांच्या चौकशीचे आदेश सहकार खात्याचे अप्पर आयुक्‍त डॉ. आनंद जोगदंड यांनी दिले आहेत. यात नगर मर्चंट बँकेवर जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे व शहर सहकारी बँकेवर तालुका उपनिबंधक राम कुलकर्णी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. काही डॉक्टरांसह राजेंद्र चोपडा व अ‍ॅड. अच्युत पिंगळे यांनी केलेल्या तक्रारीनंतर सहकार खात्याने हे पाऊल उचलले आहे.

शहर बँकेसह आणखी एका बँकेतील कर्ज प्रकरण व कामकाजाबाबत डॉ. रवींद्र कवडे, डॉ. भास्कर सिनारे, डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. उज्ज्वला काकडे, प्रमोद अष्टेकर यांनी सहकार खात्याकडे तक्रार केली होती. सहकारी संस्थांचे विशेष निबंधक व अप्पर आयुक्‍त डॉ. जोगदंड यांनी याची गांभीयाने दखल घेत, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 89 अ(1) अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी तालुका उपनिबंधक राम कुलकर्णी यांची नियुक्‍ती करुन बँकेच्या मागील तपासणी कालावधीपासून 31 डिसेंबर 2017 पर्यंतच्या कामकाजाची तपासणी करून 15 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचनाही अप्पर आयुक्‍तांनी दिल्या आहेत.

मर्चंट बँकेतील कामकाज व एकरकमी कर्जफेडीच्या एका प्रकरणाबाबत राजेंद्र चोपडा, अ‍ॅड. अच्युत पिंगळे व इतर अशा सुमारे 34 जणांनी तक्रारी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या बँकेच्या कामकाजाबाबतही अप्पर आयुक्‍तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे यांचीच चौकशी अधिकारी म्हणून मर्चंट बँकेवर नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत अनिल दाबशेडे यांना संपर्क साधला असता अप्पर आयुक्‍तांनी मर्चंट बँकेच्या कामकाजाबाबत शहानिशा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याचे ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.