Sun, Jul 21, 2019 00:15होमपेज › Ahamadnagar › तीन लाखांच्या दागिन्यांसह दोन आरोपींना केले जेरबंद

तीन लाखांच्या दागिन्यांसह दोन आरोपींना केले जेरबंद

Published On: Jun 20 2018 1:13AM | Last Updated: Jun 20 2018 12:07AMनगर : प्रतिनिधी

नगर तालुका व भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी, घरफोडी, तसेच सोनारांची दुकाने लुटणार्‍या टोळीतील दोघा आरोपींना नगर तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या दोघांचे आणखी दोन साथीदार पसार असून त्यांचा शोध सुरु आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 3 लाख पाच हजार 700 रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत.

पप्पू उर्फ प्रवीण लाला भोसले (वय 21, रा. बाभुळगाव खालसा, ता. कर्जत) व सचिन राजू काळे (वय 24, रा. कोल्हेवाडी, ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. याबाबत सविस्तर हकीगत अशी की, रुईछत्तीसी येथील आशिष शामराव गोरे यांच्या घरी दि. 9 मे रोजी पहाटे घरफोडी झाली होती. बंद असलेल्या घराचा दरवाजा उघडून 30 हजार 700 रुपये किमतीचा माल त्यात 1 मोबाईल, सोन्याची चेन व रोख रक्कम चोरण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करत असतांना गोपनीय माहिती व तांत्रिक विश्‍लेषणाद्वारे गुन्हा उघडकीस आला. त्यानुसार पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, उपनिरीक्षक महेश क्षीरसागर, आनंद सत्रे, शाबीर शेख, रवी औटी, ज्योती काळे आदींच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. चोरीस गेलेल्या मालापैकी एकूण 27 हजार 700 किमतीचा माल त्यात 5 हजारांचा मोबाईल, 20 हजारांची दीड तोळ्याची सोन्याची लगड व 3 हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.

आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांनी विविध गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानुसार 3 लाख 5 हजार 700 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोपट हर्षल भोसले (रा. बाभुळगाव खालसा, ता. कर्जत) व भैय्या मंत्री काळे (रा. चकलांबा, ता. गेवराई, जि. बीड) हे दोघे पसार आहेत. या आरोपींना पकडल्याने 2018 मधील 5 गुन्हे व 2017 मधील एक अशा सहा गुन्ह्यांची उकल झाली आहे.

पोलिसांनी पकडलेल्या आरोपींनी कर्जत पोलिस स्टेशनच्या हद्दीत राशीन, रेहकुरी, थेरगाव. श्रीगोंदा पोलिस स्टेशन हद्दीत घोगरगाव, मोहोळ. अकलूज जिल्हा सोलापूर आदी ठिकाणी घरफोड्या तसेच जबरी चोर्‍या केल्या असल्याची कबुली दिली आहे.