होमपेज › Ahamadnagar › नगरमध्ये यंदा मोहरमची टेंभा मिरवणूक नाही

नगरमध्ये यंदा मोहरमची टेंभा मिरवणूक नाही

Published On: Sep 13 2018 1:42AM | Last Updated: Sep 13 2018 1:42AMनगर : प्रतिनिधी

यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवातच मोहरम आल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने मोहरमच्या आदल्या दिवशी ‘कत्तल की रात’ला निघणारी टेंभा मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच नगरमधून पारंपरिक टेंभा मिरवणूक निघणार नाही.मोहरम विसर्जन मिरवणुकीच्या अगोदरच्या रात्री मुस्लिम बांधवांकडून ‘कत्तल की रात’ मिरवणूक काढली जाते. 

अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. परंतु, यावर्षी सार्वजनिक गणेशात्सवातच मोहरम विसर्जन मिरवणूक आहे. मोहरम मिरवणूक मार्गापासून अवघ्या काही फूटांवर सार्वजनिक गणेशोत्सवाचे मंडप, डेकोरेशन, देखावेे डेकोरेशन राहणार आहे. त्यामुळे टेंभा मिरवणुकीची धग डेकोरेशन अथवा कुठल्या मंडपाला लागल्यास त्यातून आग लागू शकते. त्यामुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी पोलिस प्रशासनाकडून टेंभा मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात येऊ नये, असे निर्देश शहरातील पोलिस ठाण्यांना दिले आहेत. मात्र, कोठला परिसरात ‘कत्तल की रात’ मिरवणूक सुरू होण्याच्या जागेवर टेंभे पेटविता येतील. मात्र, हे टेंभे मिरवणुकीत घेऊन जाता येणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच ज्यांना शहरातून सवारी मिरवणूक काढायची आहे, त्यांनाही परवानगी घेऊनच ही मिरवणूक काढावी लागणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. मोहरम विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचे ड्रोन कॅमेरे, व्हिडिओ कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर राहणार आहे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले. गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस प्रशासनाने यापूर्वी जातीय सलोखा रॅलीचे आयोजन केले होते. मोहरम विसर्जन मिरवणूक मार्गावर गणेशोत्सव मंडपांना परवानगी नाकारून, ते रस्त्यापासून काही अंतरावर उभारण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.