Fri, Apr 19, 2019 12:41होमपेज › Ahamadnagar › निघोज ग्रामस्थ रविवारी पाळणार गावामध्ये बंद

निघोज ग्रामस्थ रविवारी पाळणार गावामध्ये बंद

Published On: Jan 20 2018 1:38AM | Last Updated: Jan 19 2018 11:05PMनिघोज : प्रतिनिधी

माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती संदीपपाटील वराळ यांच्या निर्घृण हत्येला 21 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होत असून या निर्घृण हत्येचा निषेध म्हणून 21 जानेवारी रोजी संपूर्ण दिवस गाव बंद ठेवून काळा दिवस पाळण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. संदीप पाटील वराळ यांची 21 जानेवारी 2017 रोजी भरदिवसा दुपारी 2 वाजता निघोजच्या बसस्थानक परिसरातील चौकात निर्घृण हत्या करण्यात आली होती. वराळ यांच्या निर्घृण हत्येने राज्यात खळबळ उडाली होती. जिल्ह्यात सर्वत्र या हत्येचा निषेध करण्यात आला होता. पारनेर तालुक्यातील बहुतांश गावात बंद पाळण्यात येऊन गुन्हेगारांना ताबडतोब पकडण्याची मागणी करण्यात आली होती. निघोज व परिसरातील गावांनी तीन दिवस गाव बंद ठेवून वराळ यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करून जो पर्यंत गुन्हेगारांना पकडले जात नाही. तोपर्यंत बेमुदत गाव बंद ठेवण्याचा निर्णय गावकर्‍यांनी स्वयंस्फूर्तीने घेतला होता. मात्र हल्ल्यातील

सूत्रधारांना पकडण्याची मोहीम नगर व पारनेर पोलिसांनी चोवीस तासांत पूर्ण केली असे असूनही काही सुत्रधार व हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले मात्र दोन दिवसात यातील काही हल्लेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर चौथ्या दिवशी गाव बंदचा निर्णय मागे घेण्यात आला. मात्र गावातील तणावपूर्ण परिस्थिती पाहून नगर येथील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गाव व परिसरातील पोलीस बंदोबस्त एक महिन्यापेक्षा जास्त दिवस ठेवण्यात आला. दि. 26 जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये वराळ यांच्या निर्घृण हत्येचा गावकर्‍यांनी तीव्र शब्दात निषेध करुन 21 जानेवारी हा काळा दिवस म्हणून जाहीर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. संदीप पाटील वराळ यांचे निघोज व परिसरातील राजकारणावर राजकीय प्राबल्य निर्माण झाले होते. सर्वसामान्य जनतेचे काम करणारा युवानेते म्हणून त्यांचा नावलौकीक वाढला होता.

फेब्रुवारी 17 मध्ये होणार्‍या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले होते. वराळ यांनी निघोज जिल्हा परिषद गटातील संपर्क मोहिम पूर्ण केली होती. वराळ हे जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर ते राजकारणात आणखीन प्रबळ होतील, म्हणून काही राजकीय विरोधकांनी प्रविण रसाळ या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळीला हाताशी धरून वराळ यांची निर्घृण हत्या केली असल्याची खात्रीशीर भावना वराळ समर्थक व गावकर्यांची झाली आहे. काही गुन्हेगार व सुत्रधारांना पोलीसांनी अटक केली असली तरी अद्यापही काहीजण फरार आहेत. या सर्व आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी गावकर्‍यांची मागणी आहे. दि. 21 रोजी वराळ यांच्या हत्येचा निषेध करून काळा दिवस पाळण्यात येऊन पूर्ण दिवस गाव बंद ठेवून दुपारी पाच वाजता शांती मोर्चा काढण्यात येणार असून यामध्ये सर्व व्यवसायीक व जनतेने सहभागी होण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.