Wed, Aug 21, 2019 14:47होमपेज › Ahamadnagar › शौचालय असल्यास मिळणार दाखले

शौचालय असल्यास मिळणार दाखले

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 9:07PM

बुकमार्क करा

खरवंडी कासारः  वार्ताहर

 प्रत्येकाने घरोघरी शौचालये बांधण्यासाठी जनजागृती करून, विनवणी व दंडात्मक कारवाई करूनही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने शौचालय नसणार्‍या कुटुंबाना ग्रामपंचायतकडून दाखले, उतारे बंद करण्याचा ठराव खरवंडी कासार ग्रामपंचायतीने केला आहे. पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे यापूर्वी ग्रामस्थांनी  शौचालय बांधावे, यासाठी कुटुंबांना भेट देत जनजागृती केली. कलापथकद्वारे गावात जनजागृती केली. दरवाजा बंद स्टिकर लावण्यात आले,  भिंती पत्रक वाटले. गावात गुडमॉर्निंग पथक ही दिवस उजाडण्यापूर्वीच गावात येऊन उघड्यावर शौचालय जाणार्‍यांना पकडले मात्र तरीही काही कुटुंबांनी शौचालय बांधकाम केले नाही.

अखेर शौचालय नसणार्‍या कुटुंबाने शौचालय बांधकाम करावे, यासासाठी आता दाखले व  उतारे न देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. आता जे कुटुंब  शौचालय बांधकाम करणार नाही, त्या कुटुंबांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच उघडयावर शौचालयास जाताना आढळून आले तर 1200 रुपये दंड व पोलिस कारवाई केली जाणार आहे. अशा आशयाची नोटीस गटविकासअधिकारी व ग्रामसेवक यांच्या सहीने पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार  येथील शौचालय नसलेल्या कुटुंबाना बजावण्यात आली आहे. त्यामुळे शौचालय नसलेल्या कुटुंबाना शौचालय बांधकाम केल्याशिवाय आत पर्याय राहिला नाही.

 जे कुटुंब शौचालय बांधकाम करतील, त्यांना 12 हजार रुपये अनुदान देण्यात येईल. जे कुटुंब डिसेंबर अखेर शौचालय बांधकाम करणार नाहीत, शौचालयाचा वापर करणार नाही, त्यांना अनुदान मिळणार नाही. तसेच ग्रामपंचायतकडून मिळणार्‍या सेवा व  दाखले बंद करण्यात येणार आहेत. तसेच महसूल व कृषी विभाग यांचे दाखले व योजनेचा लाभ बंद करण्यात येणार आहे. स्वस्त धान्य व केरोसिन बंद करण्यात येईल.  यापूर्वी ज्या कुटुंबानी इंदिरा आवास योजना घरकुल, राजीव गांधी घरकुल योजना, रमाई आवास योजना तसेच शौचालय बांधकाम प्रोत्साहन अनुदान घेतले आहे व त्यांनी शौचालय बांधकाम केले नाही किंवा त्याचा वापर करत नाही त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही, त्यांनी शौचालय बांंधकाम चालू करावे व  स्वच्छ भारत मिशन व मग्रा रोहयोजना मधून  12 हजार अनुदानासाठी ग्रामपंचायतीकडे प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी अशोक दहिफळे यांनी केले आहे.