होमपेज › Ahamadnagar › दगडफेकीमुळे एसटी बसेस आगारातच

दगडफेकीमुळे एसटी बसेस आगारातच

Published On: Jan 03 2018 1:09AM | Last Updated: Jan 02 2018 10:57PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

कोरेगाव भीमा दंगलीचे पडसाद नगर शहर आणि तालुक्यात देखील उमटले आहेत. समाजकटकांनी एस.टी. महामंडळाच्या गाड्यांनाच टार्गेट केले आहे. दगडफेक, गाडया अडविणे या वाढत्या प्रकारामुळे परगावी जाणार्‍या बहुतांश बसेस दुपारपर्यंत आगारातच थांबविल्या गेल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती.दुपारनंतर मात्र पोलिस बंदोबस्तात बसेस सोडण्यात आल्या आहेत. 
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे सोमवारी (दि1) दोन गटांच्या घोषणाबाजीतून दगडफेकीस प्रारंभ झाला. या दगडफेकीने तणाव अधिकच चिघळला. त्यातून गाडया अडविणे, जाळपोळ आदी प्रकार मोठया प्रमाणा वाढले. त्यामुळे नगरकडे येणार्‍या बसेस आणि इतर खासगी गाड्या पुण्यातच थांबविण्यात आल्या. सोमवारी (दि.1) रात्री पुणे आणि इतर शहरांतून येणार्‍या  बसेस नगरला आल्याच नाहीत. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. नगर शहरातच बहुतांश प्रवाशांना मुक्कामी थांबण्याची वेळ आली.

दुसर्‍या दिवशी (दि.2) सकाळपासूनच जिल्हाभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले. एस.टी. महांमडळाच्या बसेसनाच समाजकंटकांनी टार्गेट केले. नगर शहरातील माळीवाडा, अरणगाव आदी ठिकाणी बसेसवर दडगफेक केली गेली. माळीवाडा परिसरात देखील समाजकंटक आक्रमक झाल्याने, एस.टी. प्रशासनाने गाड्याच न सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. बसेस जागेवरच थांबल्याने माळीवाडा, तारकपूर व पुणे बसस्थानकांवर मोठी गर्दी उसळली होती.

बसेसवर होत असलेल्या दगडफेकीमुळे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे नगरला येणार्‍या आणि नगरबाहेर जाणार्‍या बसेसचे चालक व वाहकांत चांगलीच घबराट पसरली. त्यामुळे या कर्मचार्‍यांनी बसेस घेऊन जाण्यास नकार दिला आहे.या घटनेची पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. शहरातील वातावरण अटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. त्यामुळे दुपारनंतर पोलिस संरक्षणात अनेक बसेस सोडण्यात आल्या आहेत.