Fri, Jul 19, 2019 15:40होमपेज › Ahamadnagar › दगडफेकीच्या घटनांमुळे शहरात तणाव!

दगडफेकीच्या घटनांमुळे शहरात तणाव!

Published On: Jan 03 2018 1:09AM | Last Updated: Jan 02 2018 11:00PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

कोरेेगाव भीमा येथील घटनेचे पडसाद सोमवारी रात्रीपासूनच उमटू लागले. सुरुवातीला सोशल मीडियावर अफवा पसरत असताना मध्यरात्री निलक्रांती चौकात दगडफेकीची पहिली घटना झाली. त्यानंतर मंगळवारी (दि. 2) माळीवाडा बसस्थानक परिसरात सुमारे 15-20 वाहनांवर दगडफेक झाली. थोड्याच वेळानंतर शहरातील विविध भागांत त्याचे पडसाद उमटून 8-10 ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. पोलिसांनी सायंकाळपर्यंत 11 दंगेखोरांना ताब्यात घेतले आहे. त्यातील दोन अल्पवयीन असल्याचे समजते. सायंकाळी तणाव निवळला होता. मुख्य बाजारपेठेतील व्यवहार सुरू झाले होते. 

कोरेगाव भीमा येथे दंगलीत जखमी झालेला एक युवक रात्री उशिरा भिंगारमध्ये आला. काही वेळाने आणखी दोघे शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले. मध्यरात्रीच्या सुमारास निलक्रांती चौकात एक एसटी बस अडवून तिच्या काचा फोडण्यात आल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. निलक्रांती चौकात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मंगळवारी सकाळी सुरुवातीला माळीवाडा बसस्थानक परिसरात काही युवक दाखल झाले. काही जण बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या रस्त्याने थांबले, तर काही जण बसस्थानकातच घुसले. माळीवाडा बसस्थानकात उभ्या असलेल्या बसच्या काचांवर समोरच्या बाजूने दगडफेक करण्यात आली. बसस्थानकाशेजारून रस्त्याने जाणार्‍या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. त्यात खासगी ट्रॅव्हलच्या काचाही फोडण्यात आल्या. तसेच ट्रक, इतर खासगी वाहनांवरही दगडफेक केली. सुमारे 20 च्या आसपास वाहनांवर दगडफेक झाली. दगडफेक सुरू असतानाच पोलिस निरीक्षक अभय परमार यांच्यासह कोतवाली पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी दंगेखोरांची धरपकड सुरू केली. सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा माळीवाडा बसस्थानकासह शहरातील विविध चौकांत दाखल झाला. 

माळीवाडा येथील घटनेनंतर काही वेळाने शहरातील विविध भागांत त्याचे पडसाद उमटू लागले. वेगवेगळ्या ठिकाणीची दगडफेकीच्या घटना घडल्या. दंगेखोरांनी एसटी महामंडळाच्या बसेस दगडफेकीसाठी जास्त टार्गेट केल्या होत्या. गळ्यात निळे रुमाल परिधान केलेला जमाव शहरातील दुकानदारांना दुकान बंद करण्याचे आवाहन करीत फिरत होता. पोलिस दाखल होताच हा जमाव पांगला. त्यानंतर दलित संघटनांतील कार्यकर्ते विचारविनिमयासाठी शासकीय विश्रामगृहातील बैठकीसाठी जमा झाले. शहरातील बंद दुकाने सुरू करावेत, यासाठी शहरातील लोकप्रतिनिधींसह विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते विनंती करीत फिरत होते. 

दुपारच्या सुमारास चितळे रस्ता परिसरातीलही काही दुकानांवर दगडफेक झाली. सिद्धीबाग परिसरात, कायनेटीक चौक येथेही दगडफेकीच्या किरकोळ घटना घडल्या. पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनीही दुपारी पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी भेट दिली. जिल्ह्यात उमटलेल्या पडसादाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य राखीव पोलिस दलासह नाशिक परिक्षेत्रातून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली आहे. नगर-पुणे जिल्ह्याच्या हद्दीपासून औरंगाबाद जिल्ह्यातील हद्दीपर्यंत विविध ठिकाणी रस्त्यावर पोलिसांचे फिक्ट पॉईंट ठेवण्यात आलेले आहेत. तोफखाना पोलिसांनी एक, तर कोतवाली पोलिसांनी 10 दंगेखोरांना ताब्यात घेतले आहे. त्यातील दोन जण अल्पवयीन आहेत. उर्वरीतांना अटक करण्यात येईल. याप्रकरणी कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचे गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. भिंगारमध्ये सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला. तेथील दुकाने, किरकोळ बाजारातील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. बंद पाळल्याने तेथे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.