Mon, Apr 22, 2019 15:48होमपेज › Ahamadnagar › अनधिकृत बांधकामे नियमित करण्यास प्रारंभ

अनधिकृत बांधकामे नियमित करण्यास प्रारंभ

Published On: Dec 30 2017 12:33AM | Last Updated: Dec 29 2017 10:32PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

31 डिसेंबर 2015 पूर्वीची बांधकामे प्रशमन शुल्क आकारुन नियमित करण्याबाबत शासनाने दिलेल्या आदेशानुसार मनपाकडून शहरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्याची कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी जाहीर सूचनाही मनपाकडून प्रसिध्द केली जाणार असून त्याची कार्यवाही मनपास्तरावर सुरु करण्यात आली आहे. यामुळे शहरातील हजारो बेकायदा बांधकामे नियमित करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

7 ऑक्टोबर 2017 रोजी शासनाने अध्यादेश जारी करुन बेकायदा बांधकामे प्रशमन शुल्क आकारुन नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 31 डिसेंबर 2015 पर्यंतची पात्र ठरणारी बांधकामे नियमित करुन घेण्यासाठी 30 जून 2018 पर्यंत प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. निवासीसह व्यावसायिक मालमत्तांचाही यात मोठा समावेश आहे. रुग्णालयांच्या बेकायदा बांधकामावर हायकोर्टाच्या आदेशाने कारवाई करण्यात आली होती. अशा डिसेंबर 2015 पूर्वीच्या बांधकामांनाही आता या निर्णयामुळे नियमित करण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, शासनाच्या निर्णयानुसार जे पात्र ठरतील त्यांचेच प्रस्ताव स्वीकारले जाणार असून त्यांना विकास शुल्क, प्रशमन शुल्क, पायाभूत शुल्क भरणे अनिवार्य असल्याचे मनपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. लवकरच याबाबत अधिसूचना प्रसिध्द होऊन प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. त्याची कार्यवाहीही मनपाकडून सुरु करण्यात आली आहे.