Sun, Apr 21, 2019 01:53होमपेज › Ahamadnagar › न्यायालयात जाण्याबाबत बुधवारी निर्णय

न्यायालयात जाण्याबाबत बुधवारी निर्णय

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 9:15PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

राज्य सरकारकडून मंजूर विशेष रस्ते दुरूस्तीचा निधी जिल्हा परिषदेला मिळावा यासाठी पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. पालकमंत्र्यांकडे निधीची मागणी केल्यानंतर त्यांनी मंगळवारपर्यंत निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिल्याने न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय बुधवारी (दि. 13) घेण्यात येणार आहे. विशेष रस्ते दुरुस्तीच्या (50-54) निधीची जिल्हा प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही निधी मिळत नसल्याने आता जिल्हा परिषद  पदाधिकार्‍यांनी न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात पालकमंत्री राम शिंदे यांच्याशी अध्यक्षा शालिनी विखे यांनी चर्चा केली आहे. पालकमंत्र्यांच्या विनंतीला मान देत मंगळवारपर्यंत वाट पाहण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेला राज्य सरकारकडून रस्ते विशेष दुरूस्तीसाठी 50-54 या शिर्षकाखाली निधी देण्यात येतो. या निधीचे नियोजन करण्याचे अधिकार ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला दिलेले असतांनाही, पालकमंत्री आणि जिल्ह्यातील आमदार या निधीतून रस्त्यांची कामे सुचवत आहेत. गेल्या वर्षी मागणी करूनही हा निधी जिल्हा परिषदेला देण्यात आला नव्हता. यंदाही या निधीची जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांकडून मागणी होत असतांना पालकमंत्री शिंदे हा निधी देत नसल्याचा असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य करत आहेत.

वारंवार मागणी, पत्रव्यवहार करूनही जिल्हा परिषदेला रस्ते दुरूस्तीचा निधी मिळत नसल्याने आता निधीसाठी न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत रस्त्याच्या निधीसाठी कोर्टात जाण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्हतब करण्यात आले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे महत्वाचे पदाधिकारी तसेच वकीलांशी चर्चा सुरु असून, मंगळवारी पालकमंत्री काय निर्णय घेणार? यावर न्यायालयीन लढ्याचे भवितव्य ठरणार आहे.