Tue, Nov 13, 2018 01:30होमपेज › Ahamadnagar › सोनई हत्याकांडाचा 15 जानेवारीला निकाल

सोनई हत्याकांडाचा 15 जानेवारीला निकाल

Published On: Jan 02 2018 12:53AM | Last Updated: Jan 01 2018 11:45PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

सोनई तिहेरी हत्याकांडाच्या खटल्याची सुनावणी काल (दि. 1) पूर्ण झाली असून, 15 जानेवारी रोजी निकाल लागणार आहे. नाशिक येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटल्याची सुनावणी सुरू आहे. जानेवारी 2013 मध्ये प्रेमप्रकरणाच्या संशयावरून हे हत्याकांड झाले होते. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथे जानेवारी 2013 मध्ये सचिन सोहनलाल ऊर्फ मोहनलाल ऊर्फ सोमलाल घारु, संदीप राजू थनवार आणि राहुल ऊर्फ तिलक राजू कंडारे यांचा अतिशय अमानुष पद्धतीने निर्घृण खून केला होता. हे युवक नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये कामाला होते.

त्यांना स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे, असे सांगून विठ्ठलवाडी येथे बोलावून घेण्यात आले. धनवार व कंडारे यांचा खून करून मृतदेह कोरड्या विहिरीत पुरण्यात आले, तर घारू याचे मुंडके व हातपाय अडकित्त्याने तोडण्यात आले होते. तोडलेले हातपाय एका कूपनलिकेत टाकून देण्यात आले होते. या तिहेरी हत्याकांडप्रकरणी प्रकाश दरंदले, रमेश दरंदले, पोपट दरंदले, गणेश दरंदले, अशोक फलके, अशोक नवगिरे, संदीप कुर्‍हे यांना अटक करण्यात आली होती. 

महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या मुलीचे दलित युवकासोबत प्रेमसंबंध होते, असा संशय होता. त्या रागातून हा गुन्हा घडला होता. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्यानंतर नेवासे सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली. विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. सुनावणीदरम्यान दोन गटात तणाव निर्माण होऊन साक्षीपुराव्याच्या वेळी दबाव येऊ शकतो, असा दावा करून खटल्याची सुनावणी नाशिक किंवा जळगाव येथे हलविण्याची मागणी मयताच्या नातेवाईकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केली होती. न्यायालयाने हा खटला नाशिक येथे हलविण्याचे आदेश दिले होते. सोनई तिहेरी हत्याकांडाच्या तपासात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप दलित संघटनांनी केला होता. या खटल्याची सुनावणी सोमवारी पूर्ण झाली असून, आता 15 जानेवारी रोजी लागणार्‍या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.