Sat, Apr 20, 2019 07:52होमपेज › Ahamadnagar › सौरऊर्जा प्रकल्पांसाठी मनपा सरसावली!

सौरऊर्जा प्रकल्पांसाठी मनपा सरसावली!

Published On: Dec 14 2017 1:43AM | Last Updated: Dec 13 2017 10:43PM

बुकमार्क करा

नगर ः प्रतिनिधी

वीज बिलांवर होणार्‍या खर्चात बचत व्हावी, या उद्देशातून छोट्या सौरउर्जा प्रकल्पांसाठी महापालिका चाचपणी करत आहे. महापौर सुरेखा कदम यांनी यासाठी पुढाकार घेतला असून मुख्य प्रशासकीय इमारत व देशपांडे रुग्णालय इमारतीसह पाणी उपसा करणार्‍या छोट्या पंपांसाठी सौरउर्जा प्रकल्पांचा प्रस्ताव ‘मेडा’कडे सादर करणार असल्याची माहिती महापौर सुरेखा कदम यांनी दिली.
महापालिकेला पाणी योजनेसाठी दरमहा दीड कोटी, पथदिव्यांसाठी 55 लाख रुपये तर प्रशासकीय इमारती, उद्याने, रुग्णालये असा दरमहा सुमारे 25 लाखांपर्यंतचा खर्च फक्त वीज बिलांवर करावा लागतो.

मालमत्ता कराच्या वसुलीकडे झालेले दुर्लक्ष, उत्पन्नाचे आटवलेले स्त्रोत व जीएसटीपोटी शासनाकडून पगारापुरतेच मिळणारे अनुदान यामुळे दरमहा वीजबिले भरणे तर लांबच पण दैनंदिन खर्च भागविणेही मनपाला शक्य होत नाही. गेल्या काही महिन्यांपासून महावितरण कंपनीने वीजबिलासाठी सातत्याने वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम राबविली आहे. अशा स्थितीत वीज बिलाच्या खर्चात शक्य तेवढी काटकसर व्हावी, या उद्देशातून महापौर कदम यांनी प्रशासकीय इमारती, बाळासाहेब देशपांडे रुग्णालय या दोन प्रमुख इमारतींवर छोटे सौर उर्जा प्रकल्प उभारण्याची संकल्पना मांडली आहे.

तसेच पाणी वितरणसाठीच्या टाक्यांवर वापरल्या जाणार्‍या 5 एचपी क्षमतेच्या छोट्या मोटारींसाठी सौर उर्जेचा पर्याय वापरता येईल का, याबाबत चाचपणी सुरु केली आहे. महावितरण व महाउर्जाच्या अधिकार्‍यांशी प्राथमिक चर्चा झाल्यानंतर या छोट्या प्रकल्पांसाठी महाउर्जाकडे प्रस्ताव सादर करण्याची तयारी सुरू असल्याचे महापौर कदम यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे काही प्रमाणात का होईना, वीज बिलाच्या खर्चात कपात होऊ शकेल, असा विश्‍वास त्यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.