Sun, May 26, 2019 09:46होमपेज › Ahamadnagar › रवि वाकळेंची ‘होमपीच’वरच कोंडी!

रवि वाकळेंची ‘होमपीच’वरच कोंडी!

Published On: Dec 14 2017 1:43AM | Last Updated: Dec 14 2017 12:56AM

बुकमार्क करा

नगर ः प्रतिनिधी

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेशाचा मोठा गाजावाजा करून ‘राष्ट्रवादी’ला टक्कर देण्याची तयारी करणार्‍या रवी वाकळेंची ‘होमपीच’वरच कोंडी करण्याची रणनिती विरोधकांनी आखली आहे. शिवसेनेच्या मेळाव्याचे टायमिंग साधत सावेडीलगतच्या बोल्हेगाव परिसरातील गंभीर बनलेल्या पाणीप्रश्‍नावर विद्यमान नगरसेवक व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुमार वाकळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज (दि.14) शिवसेनेच्या मेळाव्यावेळीच ‘राष्ट्रवादी’चा मोर्चा मनपावर धडकणार असल्याने दोन्ही वाकळेंमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु झाल्याची जोरदार चर्चा परिसरात आहे.

सावेडी-बोल्हेगाव परिसरात कुमार वाकळे व संपत बारस्कर यांच्या माध्यमातून ‘राष्ट्रवादी’ने चांगली पकड निर्माण केली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रवी वाकळेंच्या रुपाने ‘राष्ट्रवादी’समोर आव्हान उभे करण्याची तयारी शिवसेनेने सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वीच कुमार वाकळे यांनी या परिसरात शाखा उद्घाटनाच्या निमित्ताने विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केले होते. त्यानंतर आज रवी वाकळे आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आगामी काळात दोन्ही वाकळेंमध्ये सावेडीच्या वर्चस्वासाठी लढाई रंगणार असल्याचे निश्‍चित असले, तरी ‘राष्ट्रवादी’ने मात्र आत्तापासूनच रवी वाकळेंचे संभाव्य आव्हान थोपविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत रवी वाकळे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यासाठी त्यांनी शक्तीप्रदर्शनाची जय्यत तयारी केली आहे. ‘राष्ट्रवादी’ने या मेळाव्याचे टायमिंग साधत परिसरातील पाणीप्रश्‍नावर आजपासून आंदोलन पुकारले आहे. मे महिन्यात याच प्रश्‍नासाठी कुमार वाकळे यांनी मनपात आंदोलन छेडून अधिकार्‍यांना घाम फोडला होता. तत्कालीन आयुक्तांनी लेखी आश्‍वासन देऊन आंदोलनाचे संकट टाळले होते. मात्र, प्रश्‍न अद्यापही कायम असल्याने राष्ट्रवादीने आज पुन्हा नागरिकांना बरोबर घेऊन आंदोलन पुकारले आहे. रवी वाकळेंच्या प्रवेशासाठी मेळावा होत असतांना आणि या पार्श्‍वभूमीवर त्यांनी शहरासह सावेडी उपनगरातही शक्तीप्रदर्शन करुन वातावरण निर्मितीची तयारी केलेली असतांना कुमार वाकळे यांनी नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्‍नावर आंदोलनासाठी मेळाव्याचा नेमका मुहूर्त साधत प्रभागासह सावेडीवरील पकड आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मेळाव्याऐवजी दोन्ही वाकळेंमध्ये सुरु झालेल्या वर्चस्वाच्या लढाईची चर्चाच सावेडी परिसरात रंगली आहे.