होमपेज › Ahamadnagar › सहकार क्षेत्रानेच समृद्धी

सहकार क्षेत्रानेच समृद्धी

Published On: Jan 07 2018 2:00AM | Last Updated: Jan 06 2018 11:52PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

पतसंस्थांच्या माध्यमातून सामान्य माणसाला उभे करण्याचे काम होत आहे. ग्रामीण भागात सामान्यांची पत निर्माण करण्याचे काम पतसंस्था करतात. सहकारक्षेत्र अधिक समृध्द करण्यासाठी ग्रामीण भागात पूरक उद्योग उभे राहणे गरजेचे आहे. सहकारक्षेत्राच्या समृध्दीनेच महाराष्ट्र समद्ध होईल, असा विश्‍वास सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे व्यक्त  केला. राळेगणसिध्दी येथे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आयोजित सहकार परिषदेत मार्गदर्शन करताना देशमुख बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, सहकार भारतीचे अध्यक्ष डॉ. मुकूंद तापकीर, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, अपर निबंधक पतसंस्था ज्ञानदेव मोकणे, सहकारमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील, पंतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश वाबळे, उपाध्यक्ष वसंत लोढा आदि उपस्थित होते. देशमुख म्हणाले, ग्रामीण भागात पतसंस्था महत्वाची भूमिका बजावतात.

 गावातील सामान्य माणसाला उभे करण्याचे काम पतसंस्थांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे पतसंस्थांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. ग्रामीण भागात शेवटच्या माणसापर्यंत पतसंस्थांच्या माध्यमातून नाळ जोडली गेली पाहिजे. पारदर्शक कारभार व विश्‍वासातून सामान्य माणसाला उभे करण्यासाठी पतसंस्थांनी पुढाकार घ्यावा. राज्यात चार लाख बचत गट आहेत. या बचत गटातील महिलांमध्ये कल्पकता आहे. प्रत्येक गावातील महिलांनी एकत्र येवून उत्पादनाचा एक ब्रॅन्ड  तयार केला तर चांगला प्रतिसाद मिळेल. शिवाय महिला व तरुणांना  गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यामध्ये विक्री व्यवस्थेसाठी राज्य शासन सर्वेतोपरी मदत करेल, असे त्यांनी सांगितले.