Sun, Jul 21, 2019 16:15
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › अध्यक्षा, उपाध्यक्षांच्या दालनासमोर ठिय्या

अध्यक्षा, उपाध्यक्षांच्या दालनासमोर ठिय्या

Published On: Dec 20 2017 1:38AM | Last Updated: Dec 20 2017 12:16AM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

कार्यक्रमाला जायचे असल्याने जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी उपाध्यक्षा राजश्री घुले यांच्याकडे सभेचा कारभार सोपवून विशेष सर्वसाधारण सभेतून काढता पाय घेतला. विखे गेल्यानंतर घुले यांनी अवघ्या पंधरा मिनिटात सभा गुंडाळली. विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप करत भाजपच्या सदस्यांनी अध्यक्षा विखे व उपाध्यक्षा घुले यांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.

ना. विखेंच्या दालनासमोर झालेल्या आंदोलनात गटनेते जालिंदर वाकचौरे, सोमीनाथ पाचारणे, कांतीलाल घोडके, दीपाली गिरमकर, वंदना लोखंडे, किरण लहामटे, ललिता शिरसाठ, ताराबाई पंधरकर आदी सहभागी झाले होते. तर उपाध्यक्षा घुलेंच्या दालनासमोर झालेल्या आंदोलनात हर्षदा काकडेही सहभागी झाल्या.

जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा अध्यक्षा विखेंच्या अध्यक्षतेखाली  सुरु होती. कार्यक्रमाला जायचे असल्याने विखेंनी उपाध्यक्षा घुलेंकडे सभेची सूत्रे दिली. विखे गेल्यानंतर भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे बोलण्यास उभे राहिले. त्यांच्या सोबतीला भाजपचे काही सदस्यही बोलण्यास उभे राहिले. मात्र ही विशेष सभा असून, बाकीचे विषय लेखी कळविण्याचे उपाध्यक्षा घुले यांनी त्यांना सांगितले.

घुले यांनी राष्ट्रगीत सुरु करण्यास सांगत सभा संपल्याचे जाहीर केले. राष्ट्रगीत झाल्यावर भाजपच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत अध्यक्षा विखेंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. सदस्य राजेश परजणे, हर्षदा काकडे यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘वर्षभरात झालेल्या विकासकामांचा हिशेब द्या’, ‘जलव्यवस्थापन समितीच्या राजस्थान दौर्‍याची माहिती द्या’, अशी घोषणाबाजी भाजप सदस्यांनी केली.

हर्षदा काकडे यांनी यावेळी मध्यस्थी करत ‘अध्यक्षा विखे सभेच्या शेवटी उपस्थित नसल्याने उपाध्यक्षा घुलेंच्या दालनाबाहेर ठिय्या द्या, मीही तुमच्यात सहभागी होते’ म्हणत भाजपच्या नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. काकडेंचे आव्हानानंतर भाजप सदस्यांनी उपाध्यक्षांच्या दालनाबाहेर ठिय्या देत घोषणाबाजी सुरु केली. घोषणाबाजी ऐकताच घुलेंनी दालनाबाहेर येत ‘तुमच्या सर्व मागण्या ऐकून घेऊ, पण तुम्ही आंदोलन मागे घ्या’, अशी विनंती केली. 15 मिनिट झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.