Sun, Mar 24, 2019 23:47
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › तलावांसह बंधार्‍यांना मिळणार नवसंजीवनी!

तलावांसह बंधार्‍यांना मिळणार नवसंजीवनी!

Published On: Dec 16 2017 1:38AM | Last Updated: Dec 16 2017 1:04AM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 227 तलाव व बंधार्‍यांना नवसंजीवनी मिळणार आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने साडे दहा कोटींच्या दुरुस्ती कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केले असून, त्याला मान्यता मिळाल्यानंतर टेंडर प्रक्रिया होऊन कामांना सुरुवात होणार आहे.

लघु पाटबंधारे विभागामार्फत जलयुक्त शिवार योजनेंतर्गत गाव तलाव, पाझर तलाव, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, साठा बंधारे यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने 2017-18 या आर्थिक वर्षासाठी एकूण 289 कामांसाठी 24 कोटी 27 लाखांच्या कामांचा आराखडा तयार केला आहे. त्यातील 227 कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात झाले आहे.
सध्या जिल्हाधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांच्याकडे आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने पाठविलेले प्रस्ताव मंजूर होण्यास अडचण वाटत नाही. 

प्रस्तावांना जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिल्यानंतर सर्व कामांची स्वतंत्र इ- निविदा निघेल. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास कमीत कमी दोन महिन्यांचा अवधी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल. मार्च अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे लघु पाटबंधारे विभागाचे उद्दिष्ठ असले तरी प्रत्यक्ष काम पूर्ण होण्यास जून महिना उघडणार आहे.