Tue, Jul 16, 2019 00:10होमपेज › Ahamadnagar › बर्किंग नाही, तपासाचे प्रमाण वाढले

बर्किंग नाही, तपासाचे प्रमाण वाढले

Published On: Dec 31 2017 1:30AM | Last Updated: Dec 30 2017 11:43PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

जिल्हा पोलिसांकडून कोणताही गुन्हा अजिबात दडपविला जात नाही. जेथे गुन्ह्यांची संख्या घटते, तेथे बर्किंग होते. गुन्ह्यांची संख्या वाढेलच. त्यावरून पोलिसांची प्रगती तपासली जाऊ शकणार नाही, तर ती तपासाच्या प्रमाणावरून ठरविला येईल. गंभीर गुन्ह्यांच्या तपासाचे प्रमाण सरत्या वर्षात 72 टक्क्यापर्यंत आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी काल (दि. 30) पत्रकारांशी वार्षिक कामगिरीबाबत बोलताना सांगितले. 

यावेळी अपर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, रोहीदास पवार व जिल्ह्यातील सर्व पोलिस उपअधीक्षक उपस्थित होते. शर्मा म्हणाले की, जानेवारी ते नोव्हेंबर महिनाअखेरपर्यंत भाग पाचपर्यंतचे 6 हजार 962 गुन्हे दाखल झाले होते. त्यातील 5 हजार 3 गुन्ह्यांचा तपास लागलेला आहे. खुनाच्या तपासाचे प्रमाण 89 टक्के आहे. ज्या गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही, त्यात खूप शोध घेऊनही आरोपी गजाआड करता आलेले नाहीत. खूनाचा प्रयत्न, दरोड्याच्या गुन्ह्यांचा 100 टक्के तपास झालेला आहे. सोनसाखळी चोरीच्या तपासाचे प्रमाणे नोव्हेंबर अखेर 20 टक्के असून, ते डिसेंबरध्ये आणखी वाढू शकते. चोरी, जबरी चोरी वगळता इतर गुन्ह्यांच्या तपासात जिल्हा पोलिस प्रशासनाची कामगिरी चांगली आहे.

त्या गुन्ह्यांचा तपासही 100 टक्क्यापर्यंत आणण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनावर असून, त्यावरही लवकरच योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. दरोडेखोरांना प्रतिबंध बसावा, यासाठी राबविलेल्या मोहीमेत जवळपास 39 टोळ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून दरोड्याच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. भाग सहाच्या गुन्ह्यांच्या तपासाचे प्रमाण यावर्षी 100 टक्के आहे. प्रतिबंधात्मक कारवाईसाठी तडीपारी, ‘मोक्का’, एमपीडीए अन्वये कारवाईचे प्रस्ताव तयार केले जात आहेत. तडीपारीचे 106 प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. त्यातील 10 जणांच्या तडीपारीचा आदेश झालेला आहे. एमपीडीएचे दोन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आलेले आहेत.

राहाता तालुक्यात लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यातील एका टोळीविरुद्ध ‘मोक्का’चा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो सध्या मंजुरीसाठी नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात आलेला आहे, असेही शर्मा यांनी सांगितले. दोषसिद्धीतेचा दर वाढविण्यासाठी पोलिस ठाण्यात फिर्यादीने स्वतःच्या हस्ताक्षरात फिर्याद नोंदवावी, यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घेतलेला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत चालला आहे. एका बाजूला पोलिसांना मनासारख्या बदल्या देत असलो, त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवत असलो, तरी बेशिस्त पोलिसांची अजिबात गय केली जात नाही. गुन्ह्यांची पेंन्डसी ठेवणारे, वेळेत तपास पूर्ण न करणार्‍या तब्बल 50 तपासी अधिकार्‍यांना त्यांची वेतनवाढ तीन वर्षांसाठी का रोखण्यात येऊ नयेत, अशी नोटीस काढली आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे.  गुन्हेगारी दत्तक योजनेचाही आढावा घेण्यात आलेला आहे. सन 2018 मध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी केलेली दिसेल. सराईत गुन्हेगारांची माहिती तयार करण्यात आली आहे. शनिवारी पोलिस उपअधीक्षकांच्या बैठकीत त्याबाबत आढावा घेण्यात आलेला आहे, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.