Wed, Jul 17, 2019 18:00होमपेज › Ahamadnagar › ‘नियोजन’चे २५० कोटी पडून!

‘नियोजन’चे २५० कोटी पडून!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेत सत्ताबदल होऊन दहा महिने उलटत आले असतांना एकही काम होत नसल्याची ओरड सदस्यांकडून केली जात आहे. नियोजन समितीकडून निधी मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या जात असतांनाच, जिल्हा परिषदेकडून प्रशासकीय मान्यताच नसल्याने नियोजन समितीचे 250 कोटी रुपये पडून असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून प्रशासकीय मान्यता नियोजन समितीला कधी सादर होणार हाच मोठा प्रश्‍न आहे.

नियोजन समितीमार्फत जिल्हा वार्षिक योजनेसाठी 2017-18 सालाकरिता सर्वसाधारण, विशेष घटक, आदिवासी, ओटीएसपी आदी बाबींसाठी जवळपास 260 कोटी 88 लाखांचा नियतव्यय मंजूर आहे. त्यातील अवघा 12 कोटी 68 लाख 12 हजाराचा निधी अद्यापपर्यंत जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. यात लघु पाटबंधारे विभागासाठी 2 कोटी 72 लाख, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागासाठी 3 कोटी 10 लाख, उत्तर विभागासाठी 3 कोटी 83 लाख, ग्रामपंचायत विभागासाठी 3 कोटी 1 लाख रुपये निधी मिळाला आहे.

जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेला आधी संबंधित कामासाठी प्रशासकीय मान्यता घ्यावी लागते. एकीकडे जिल्हा परिषदेला निधी नाही. कामे होत नाहीत. अशा प्रकारे गवगवा होत असतांना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या अधिकारी वर्गाने प्रशासकीय मान्यताच घेतलेली नसल्याची बाब जाणिवपूर्वक दडवली जात असल्याचे दिसते. याबाबत जिल्हा परिषदेत विचारणा केली असता प्रशासकीय मान्यता तयार करण्याचे काम सुरु असल्याचे कळाले. ज्या त्या आर्थिक वर्षातील निधी हा ज्या त्याच वर्षात खर्च केला जाणे गरजेचे आहे. मात्र कामांच्या प्रशासकीय मान्यताच उशिरा सादर करून, कामांना पुढील वर्षात ढकलण्याचे काम सुरु असल्याचे दिसते.