होमपेज › Ahamadnagar › 28 अधिकारी सामूहिक रजेवर

28 अधिकारी सामूहिक रजेवर

Published On: Jan 02 2018 12:53AM | Last Updated: Jan 02 2018 12:00AM

बुकमार्क करा
नगर ः प्रतिनिधी

मनपाच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकारी व सदस्यांकडून अधिकारी-कर्मचार्‍यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा आरोप करत तीन राजपत्रित अधिकार्‍यांसह मनपाचे 28 अधिकारी कालपासून (दि.1) सामुहीक रजेवर गेले आहेत. दरम्यान, अधिकार्‍यांवर निलंबनाच्या कारवाईचे अधिकार महासभेला नाहीत, महासभा फक्त सूचना देऊ शकते, असे आयुक्त घनश्याम मंगळे यांनी स्पष्ट करत पथदिवे घोटाळ्याची चौकशी होणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

शनिवारी (दि.30) झालेल्या सभेत पथदिव्यांच्या कामातील घोटाळ्यावरून मोठा गदारोळ झाला. बिले अदा झाल्यानंतर कामांना सुरुवात झाल्याचे उघड झाल्यानंतर पदाधिकारी-नगरसेवकांनी अधिकार्‍यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी लावून धरली. महापौर सुरेखा कदम यांनी शहर अभियंता विलास सोनटक्के, विद्युत विभाग प्रमुख रोहिदास सातपुते, पर्यवेक्षक बाळासाहेब सावळे यांना निलंबित करण्याचे व चौकशीचेही आदेश दिले. मात्र, मुख्य लेखापरीक्षक चंद्रकांत खरात, लेखाधिकारी दिलीप झिरपे व उपायुक्त विक्रम दराडे यांच्याही सह्या असल्याने त्यांच्यावरही कारवाई करावी, या सहा अधिकार्‍यांना तात्काळ सभागृहातून बाहेर काढावे, अशी मागणी सर्वच नगरसेवकांकडून करण्यात आली.

सावळे, सोनटक्के व सातपुते सभागृहात बाहेर गेल्यानंतरही इतर तीन अधिकारी सभागृह सोडण्यास तयार नसल्याने काही आक्रमक सदस्यांनी व्यासपीठावर जावून त्यांना बाहेर हुसकावले. सभागृहात झालेल्या या प्रकाराचा निषेध करत अधिकार्‍यांना अपमानास्पद व अमानवी वागणूक दिल्याचा आरोप मनपा कर्मचारी युनियने केला आहे. मानसिक संतुलन बिघडल्यामुळे व अधिकारी भयभीत झाल्यामुळे ते सभेतही बसू शकत नाहीत, असा पवित्रा घेत 28 अधिकारी सामुहीक रजेवर गेले आहेत. त्यामुळे काल दिवसभर मनपाचे कामकाज ठप्प झाले आहे. याबाबत आयुक्त मंगळे यांनीही घडलेला प्रकार चुकीचाच असल्याचे सांगितले. महासभेला निलंबनाचे अधिकार नाहीत, ते फक्त सूचना देऊ शकतात, असे स्पष्ट करत पथदिव्यांच्या कामातील घोटाळ्याची चौकशी करणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. दरम्यान, अधिकार्‍यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मनपात पदाधिकारी विरुध्द अधिकारी असा संघर्ष सुरु झाला आहे.