Tue, Apr 23, 2019 09:35होमपेज › Ahamadnagar › फेरसुनावणीसाठी जनहित याचिका

फेरसुनावणीसाठी जनहित याचिका

Published On: Dec 20 2017 1:38AM | Last Updated: Dec 20 2017 12:26AM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी  

नितीन आगे प्रकरणात फेरसुनावणी घ्यावी, नगर जिल्हा दलित अत्याचारग्रस्त प्रदेश म्हणून जाहीर करावा आदी मागण्यांसाठी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते संजय रमेश भालेराव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर आज (दि. 20) औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती शरद बोर्डे, न्या. खंडेलवाल यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. ‘न्याय नितीनचा’ या वृत्तमालिकेत ‘पुढारी’ने खर्डा येथील नितीन आगे खून प्रकरणात बेस्ट बेकरी हत्याकांडाचा संदर्भ घेऊन फेरसुनावणी घेता येऊ शकते, हे निदर्शनास आणून दिले होते.

भालेराव यांनी दाखल केलेल्या याचिकेत फेरसुनावणीची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. भालेराव यांच्यावतीने अ‍ॅड. नितीन सातपुते, अ‍ॅड. डावरे हे काम पाहत आहेत. याबाबत ‘पुढारी’शी बोलताना याचिकाकर्ते भालेराव म्हणाले की, नितीनला न्याय मिळावा, यासाठी या खटल्याची फेरसुनावणी मुंबईत घेण्यात यावी, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्ह्यांचा रेषो तयार करून नगर जिल्हा दलित अत्याचारग्रस्त प्रदेश म्हणून जाहीर करावा, या खटल्याचे कामकाज पाहणारे सरकारी वकील व गुन्ह्याचा तपास करणारे तपासी अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

आगे प्रकरणातील सर्व आरोपींची जिल्हा व सत्र न्यायालयाने 23 नोव्हेंबर रोजी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केल्यानंतर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आगे प्रकरणात लक्ष घातले. फितूर साक्षीदारांवर कारवाई करून खटल्याचे उच्च अपील करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून सरकारी पक्षाने जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. तसेच फितूर साक्षीदारांवरील कार्यवाहीची प्रक्रिया सुरू केली आहे. नितीन आगे याला न्याय मिळण्यासाठी कोणते कायदेशीर मार्ग आहेत, याबाबत ‘पुढारी’ने ‘न्याय नितीन’चा या वृत्तमालिकेद्वारे काही पर्याय सूचविले होते. त्यातील पहिल्या भागातच फेरसुनावणीचा पर्याय सूचविण्यात आला होता.