होमपेज › Ahamadnagar › आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची गरज

आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची गरज

Published On: Sep 04 2018 11:37PM | Last Updated: Sep 04 2018 11:37PMनगर : प्रतिनिधी

आगामी वर्ष हे निवडणुकांचे आहे. या निवडणुका लक्षात घेऊन स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी काही राजकीय नेत्यांकडून आरक्षणाचा विषय काढला जात आहे. वास्तविक पाहता घटनेनुसार 50 टक्के पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. त्यामुळे सुरू असलेल्या आंदोलनांचा काहीही उपयोग होणार नाही. यावर उपाय म्हणून समाजातील सर्व घटकांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस प्रताप ढाकणे यांनी केली आहे.

वंजारी समाजाच्या आरक्षणासाठी भगवानगडावर फुलचंद कराड यांनी नुकतीच बैठक घेतली. त्यावर कराड यांच्याकडून दिशाभूल होत असल्याचा आरोप ढाकणे यांनी केला. नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रताप ढाकणे यांचे पुत्र ऋषिकेश ढाकणेही उपस्थित होते. ढाकणे म्हणाले की, सध्या देशभरात विविध समाजांकडून जातीय आरक्षणाची मागणी होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण देताना 20 वर्षांपर्यंत आरक्षण द्यावे, त्यानंतर देऊ नये, असे घटनेत लिहिले. वंचित वर्गाला शेकडो वर्षे सामाजिक व्यवस्थेच्या स्थितीमुळे मुख्य प्रवाहात येता आले नाही. म्हणून 20 वर्षे आरक्षणाची तरतूद डॉ. आंबेडकरांनी केली होती. त्यानंतर मात्र राजकीय हेतूने प्रेरित होऊन दर 20 वर्षांनी आरक्षणाला मुदतवाढ दिली गेली. प्रत्येक समाज आरक्षणासाठी भांडत आहे. आरक्षणावरून देशात समाज-समाजामध्ये फूट पडत आहे. अनेक उच्चवर्णीयांमध्येही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले गरीब आहेत. तर आरक्षण घेत असलेल्या समाजातही अनेक श्रीमंत दिसून येतात. समाजासमाजतील ही दरी मिटविण्यासाठी आर्थिक निकष लावूनच आरक्षण देण्याची गरज असल्याचे ढाकणे म्हणाले.

वंजारी समाज हा पूर्वी ओबीसीमध्ये होता. परंतु, राजकीय फायद्यासाठी एनटी (ड) मध्ये समावेश करण्यात आला. त्यावेळी 27 टक्के आरक्षण ओबीसींसाठी होते. मात्र, एनटी (ड) मध्ये समावेश केल्यानंतर वंजारी समाजाला फक्त दोन टक्के आरक्षण मिळाले. बबनराव ढाकणे, भास्करराव आव्हाड यांनी त्यावेळी एनटी (ड) मध्ये वंजारी समाजाला आरक्षण देण्यास विरोध केला होता. मात्र, एनटीमध्ये गेल्यावर समाजाचे कल्याण होईल, अशी भावना त्यावेळी निर्माण करण्यात आली. राजकीय हेतूसाठी समाजाला त्यावेळी भडकावण्यात आले. वंजारी समाजाचा समावेश एनटीमध्ये करण्यास हरकत नाही, असा अहवाल त्यावेळी वधवा समितीने दिला होता. परंतु, वंजारी समाजाचा एनटीमध्ये समावेश करून समाजाची फसवणूक करण्यात आली. याचा सुशिक्षितांना आजही पश्‍चाताप होत आहे. वंजारी समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करावे, यासाठी बैठक घेण्यात आली. मात्र, एनटीमधून ओबीसीमध्ये समावेश होऊ शकणार नाही. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी ढोंगबाजी करण्यात येत आहे. हे समाजासाठी घातक आहे. फुलचंद कराड यांच्या सारख्यांनी सुरू केलेली ही ढोंगबाजी न थांबविल्यास माझ्यासारखे शेकडो कार्यकर्ते संघर्ष करण्यास तयार आहेत. सर्व राजकीय पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची भूमिका घ्यावी, अशी माझी व्यक्तिगत मागणी आहे. संधी मिळाल्यास पक्षीय पातळीवर हा मुद्दा मांडणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.