Tue, Apr 23, 2019 23:46होमपेज › Ahamadnagar › आयात उमेदवारांवरच ‘भाजपा’ची मदार!

आयात उमेदवारांवरच ‘भाजपा’ची मदार!

Published On: Sep 03 2018 1:38AM | Last Updated: Sep 03 2018 12:52AMनगर : प्रतिनिधी

आगामी निवडणुकीत महापालिका स्वबळावर खेचून आणण्याच्या तयारीला लागलेल्या भारतीय जनता पार्टीची उपनगर परिसरात सक्षम उमेदवारांच्या शोधासाठी चांगलीच दमछाक झाल्याचे चित्र आहे. केडगाव, बोल्हेगाव, नागापूर, मुकुंदनगर, कल्याणरोड परिसरातील प्रभागांत अपवाद वगळता निवडणुकीत आव्हान उभे करु शकणारे कार्यकर्तेच नसल्याने उमेदवार ‘आयात’ करण्यावरच पक्षाच्या नेत्यांकडून भर दिला जात आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्नही जोरात सुरु आहेत.
केंद्रात, राज्यात भाजपाची निर्विवाद सत्ता आल्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. नुकत्याच झालेल्या जळगाव, सांगली महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या विजयानंतर नगर महापालिका ताब्यात घेण्यासाठी स्थानिक पदाधिकार्‍यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबई येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या पक्षाच्या बैठकीतही मनपा ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना आखण्यात आली. इतर पक्षातील सक्षम उमेदवारांना स्वपक्षात घेवून निवडून आणण्याची भाजपाची रणनिती जळगाव, सांगलीत यशस्वी ठरली. त्याच धर्तीवर नगरमध्येही विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना निमंत्रणे धाडण्यात आली आहेत. विविध पक्षातील सुमारे 10 ते 15 विद्यमान नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याचे भाजपाचे पदाधिकारी सांगत आहेत. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागात व सावेडी उपनगर परिसरातील काही प्रभाग वगळता उपनगर परिसरात उमेदवार शोधण्यासाठीही भाजपा कसरत करावी लागत आहे.

नागापूर, बोल्हेगाव, कल्याण रोड, केडगाव, मुकुंदनगर या भागात एखादा-दुसरा पदाधिकारी सोडला तर भाजपाकडे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससमोर सक्षम पर्याय उभा करण्यासाठी कार्यकर्ते नाहीत. गेल्या दोन वर्षांत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने उपनगर परिसरात कार्यकर्त्यांची फौज उभी करण्यासाठी कंबर कसली होती. त्यामुळे या परिसरात स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी त्यांची रणनिती सुरु झाली आहे. भाजपाकडे मात्र स्वतःचे सक्षम कार्यकर्ते नसल्याने विरोधकांमधील नाराज पदाधिकारी, नगरसेवकांवरच त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. काही नगरसेवकांना गळाला लावण्याचे त्यांचे प्रयत्नही सुरु आहेत. मात्र, प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर झोप उडालेल्या विद्यमान नगरसेवकांकडून नव्याने चाचपणी सुरु झाली आहे. भाजपाच्या नेत्यांशी चर्चा होऊनही अद्याप नगरसेवकांकडून प्रवेशासाठी हिरवा कंदील दाखविला जात नसल्याने उमेदवारांची शोधाशोध कायम असल्याचे चित्र आहे.