Wed, Nov 14, 2018 23:45होमपेज › Ahamadnagar › लक्ष्य २०१८ अन् इच्छुकांची जत्रा!

लक्ष्य २०१८ अन् इच्छुकांची जत्रा!

Published On: Dec 26 2017 1:31AM | Last Updated: Dec 25 2017 10:20PM

बुकमार्क करा

नगर : मुरलीधर तांबडे

महापालिकेची निवडणूक वर्षावर येऊन ठेपली असून, राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. ‘भावी’ नगरसेवकांची केडगावात लाट आली आहे. नगरसेवकपदाचे अनेकांना डोहाळे लागले आहेत. इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असून, सोशल मीडियावर भलतेच अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. ‘लक्ष्य 2018’ चे उद्दिष्ट्य नजरेसमोर ठेवून कामाला लागले आहेत. ‘भावी नगरसेवक’ अशी उपमा लावत ‘चमकोगिरी’ करण्यास सुरुवात केली आहे. 

महापालिकेची डिसेंबरमध्ये निवडणूक होणार आहे. अजून वर्ष बाकी असलेतरी ‘मेंबर’ होण्याची तरुणाईला ओढ लागली आहे. त्यादृष्टीने सगळेच कामाला लागले आहेत. वाढदिवसाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे करून त्यातून स्वतःला ‘प्रोजेक्ट’ करण्याचे काम केले जात आहेत. फ्लेक्स, लग्न, फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप यातून स्वतःचे मार्केटिंग जोरात सुरू आहे. आपण या पदासाठी कसे ‘परफेक्ट’ आहेत, हे बिंबविण्याचा फंडा राबविण्यास सुरुवात झाली आहे. प्रभागांतील प्रलंबित प्रश्‍नांचा अनेकांना उमाळा आला आहे. त्यासाठी निवेदने, आंदोलने करत आपली बांधिलकी समाजप्रती असल्याचे दाखवून दिले जात आहे. 

महापालिकेच्या यावेळेस होणार्‍या निवडणुकीतून एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. केडगावात सध्या आठ नगरसेवक आहेत. त्यामुळे दोन प्रभागांतून आठ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. त्यामुळेे अनेकांनी आतापासून गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. प्रभागरचना जाहीर होण्यास बराच वेळ बाकी आहे. ही रचना कशी होते, यावर बर्‍याच जणांचे उमेदवारीचे गणित अवलंबून राहणार आहेत, त्यात पुन्हा आरक्षण. हे सर्व विचारात घेऊन पुढील डावपेच आखण्याचे काहींचे काम सुरू आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या केडगावात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशी इनकमिंग, आऊटगोईंग होणार आहे. काहीही झाले तरी यंदा निवडणूक लढावायचीच, असा निर्धार करीत अनेकांनी मनाशी तयारी सुरू केली आहे. राजकीय वारे जसे वाहील, त्यावर निवडणुकीचे वातावरण तापणार आहे.