Wed, Apr 24, 2019 19:45होमपेज › Ahamadnagar › ...तर स्वबळावर भाजपाचा झेंडा मनपावर फडकविणार

...तर स्वबळावर भाजपाचा झेंडा मनपावर फडकविणार

Published On: Aug 31 2018 1:36AM | Last Updated: Aug 31 2018 12:12AMनगर : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची जोरदार तयारी आहे. या निवडणुकीत कोणी बरोबर येण्यास इच्छुक असेल तर त्यांना बरोबर घेऊ. नाही आले तर त्यांच्याशिवाय स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. स्वबळावर पूर्ण ताकद लावून महापालिकेवर भाजपाचा झेंडा  फडकविणारच, असा निर्धार पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नगर महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीत शिवसेना व इतर मित्र पक्षांबरोबर युती करणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला असता पालकमंत्री बोलत होते. या निवडणुकीसाठी आमच्याबरोबर येण्यास कोणी तयार असतील तर त्यांना बरोबर घेतले जाईल. नाही कोणी आले तर आमचे कार्यकर्ते  स्वबळावर निवडणूक लढविण्यास तयार आहेत. स्वबळावर महापालिकेवर सत्ता आणण्याची आमची प्रबळ इच्छा आहे. त्यानुसार भाजपाचे प्रयत्न देखील युध्दपातळीवर सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

सीनाचे सुशोभिकरण

गेल्या अनेक वर्षांपासून सीना नदी अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली होती. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी मनपा आयुक्तपदाचा कारभार हाती घेतला आणि सीना नदीचा श्‍वास मोकळा झाला. या कामी जिल्हाधिकारी कौतुकास पात्र असल्याचे त्यांनी नमूद केले. सीना अतिक्रमणमुक्त झाल्याने,  तीचे पात्र आता दिसू लागले आहे  या नदीच्या सुशोभीकरणासाठी नगर विकास मंत्रालयाकडून नगरोत्थान तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत निधी उपलब्ध केला जाईल. त्यासाठी प्रस्ताव तयार केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार असून, या सुशोभिकरणामुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

जिल्हा विभाजन ही जनतेची मागणी आहे. पालकमंत्री म्हणून ही मागणी पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे. त्यानुसार शासनपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. जिल्हा विभाजनास विरोध करणारे आता अनुकूल झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस देखील याबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे लवकरच विभाजन अटळ असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील उडडाणपुलाचे काम निश्‍चित होणार आहे शासन निर्देशानुसार त्याचे काम लवकरच मार्गी लागेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. नगरमधील बायपासचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर शहरात वाहतूक कोंडी होवू नये, यासाठी संबंधित अधिकार्‍यांची 1 सप्टेंबर रोजी बैठक आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले.