Sat, Jul 20, 2019 13:03होमपेज › Ahamadnagar › शिवसेनेवर ‘खाट’ अन् ‘भाजप’ला वाट!

शिवसेनेवर ‘खाट’ अन् ‘भाजप’ला वाट!

Published On: Sep 13 2018 1:42AM | Last Updated: Sep 13 2018 12:36AMनगर : प्रतिनिधी

महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील रक्तविघटन प्रयोगशाळेचे बुधवारी (दि. 14) उद्घाटन निश्‍चित करण्यात आले आहे. उद्घाटनाचा कार्यक्रम ठरविताना या प्रयोगशाळेसाठी पाठपुरावा करुन निधी मिळविणारे आ. संग्राम जगताप यांच्यासह महापौर सुरेखा कदम यांनाही प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी अंधारात ठेवल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, महापालिका निवडणूक तोंडावर असताना सत्ताधारी शिवसेनेला डावलून पालकमंत्री या नात्याने भाजप नेते राम शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन जाहीर केल्यामुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आ. संग्राम जगताप महापौर असताना त्यांनी रक्तविघटन प्रयोगशाळेतील मशिनरीसाठी सुमारे 95 लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन मंडळातून मिळविला होता. याबाबतचा प्रस्ताव करण्यापासून ते निधी मिळविण्यापर्यंत त्यांनीच पाठपुरावा केला. या प्रयोगशाळेची उभारणीही त्यांच्याच कारकिर्दीत झाली. या प्रयोगशाळेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम प्रशासनाकडून निश्‍चित करण्यात आला आहे. असे असताना आ. जगताप यांना कल्पना न देताच पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते या प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे मनपाकडून बुधवारी (दि.12) जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आ. जगताप यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रितही करण्यात आले नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

दुसरीकडे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेसह महापौर सुरेखा कदम यांनाही कार्यक्रमाच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर उपस्थित राहण्यासाठी कळविण्यात आले आहे. कार्यक्रम निश्‍चित करताना, पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे जाहीर करताना महापौर कदम यांच्याशी साधी चर्चाही प्रशासनाने केली नसल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाने केलेल्या कृत्याचा सत्ताधारी शिवसेनेलाही धक्का बसला आहे.

कार्यक्रमाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्तांना, प्रशासनाला असले, तरी शहरातील लोकप्रतिनिधी, महापालिकेतील सत्ताधारी व विशेषतः महापौरांशी प्रशासनाने चर्चा करणे अपेक्षित होते. मात्र, आमदारांसह महापौरांनाही अंधारात ठेवत प्रशासनाने पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे प्रयोगशाळेचे उद्घाटन वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची चिन्हे आहेत.