Tue, Jul 23, 2019 11:51होमपेज › Ahamadnagar › अन्यथा गौण खनिज कामावर बहिष्कार टाकू

अन्यथा गौण खनिज कामावर बहिष्कार टाकू

Published On: Dec 16 2017 1:38AM | Last Updated: Dec 16 2017 12:59AM

बुकमार्क करा

नगर ः प्रतिनिधी

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर वारंवार हल्ले सुरु आहेत. त्यामुळे महसूल अधिकारी व कर्मचारी यांचे मनोधैर्य खचले आहे. अवैध वाळूउपसा व वाहतूकीस प्रतिबंध करण्यासाठी  कायमस्वरुपी सशस्त्र पोलिस पथक तहसीलस्तरावर उपलब्ध करुन द्यावे अन्यथा गौण खनिजासंबंधीचे कोणतीही कामे केली जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने दिला आहे.

पारनेर तालुक्यातील तहसीलदार भारती सागरे यांना जाळून मारण्याचा प्रयत्न झाल्याने महसूल अधिकारी व कर्मचार्‍यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा राज्यभरात निषेध होत आहे. महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच निवेदन दिले आहे.

अवैध गौणखनिजाचे उत्खनन व वाहतुकीला प्रतिबंध करताना महसूल अधिकारी व कर्मचार्‍यांवर अनेकदा हल्ले झाले आहेत. या हल्ल्यात अनेक अधिकारी व कर्मचारी जखमी झाले आहेत. अशा प्रकारच्या कारवाईसाठी तहसीलस्तरावर कायमस्वरुपी सशस्त्र पोलिस पथक उपलब्ध करावे, अशी मागणी शासनाकडे वारंवार केली. परंतु याबाबत शासनाने कोणताही धोरणात्मक निर्णय अद्यापि घेतला नाही.  26 जानेवारी 2018 पर्यंत कायमस्वरुपी सशस्त्र पोलिस पथक तहसीलस्तरावर उपलब्ध करा तसेच पारनेर घटनेतील आरोपींंवर कठोर कारवाई करण्याबाबतचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना देण्यात यावे, अन्यथा 27 जानेवारीपासून गौण खनिजच्या कामावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने निवेदनाव्दारे दिला आहे.