Sun, Apr 21, 2019 01:52होमपेज › Ahamadnagar › भाडेपट्ट्यावर दिलेल्या जमिनींचा घेणार ताबा

भाडेपट्ट्यावर दिलेल्या जमिनींचा घेणार ताबा

Published On: Dec 17 2017 1:31AM | Last Updated: Dec 16 2017 11:50PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

पूर्वीच्या काळी 15, 20, 30, 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर विविध शैक्षणिक, सामाजिक संस्था, व्यक्तींना नाममात्र दराने जमिनी देण्यात आल्या होत्या. या जमिनींची मूळ मालकी महसूल विभागाची आहे. भाडेपट्ट्याचा करार संपूनही कराराचे नूतनीकरण न केलेल्या जमिनींचा ताबा घेण्यात येणार आहे.  जिल्ह्यात महसूल विभागाच्या अनेक जमिनी ह्या जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये, बसस्थानके, यांच्यासह खाजगी व्यक्तींना शेतीसाठीही देण्यात आल्या आहेत. अशा एकूण शंभर पेक्षा जास्त जमिनी जिल्ह्यात आहेत. यामध्ये मोठमोठ्या शैक्षणिक, सामाजिक संस्थांचा समावेश आहे.
भाडेकरार संपल्यानंतर सदर जमिनीच्या भाडेकराराचे नूतनीकरण करणे आवश्यक होते.

मात्र अनेकांनी भाडेकराराचे नूतनीकरण न केल्याने जमिनीचा शर्तभंग झाला. महसूल विभागाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर संबंधितांना रीतसर नोटिसा बजाविण्यात आल्या. वारंवार मुदतवाढ देऊनही अनेक संस्थांनी व व्यक्तींनी प्रस्ताव सादर केलेले नाहीत. शर्तभंग झाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व जमिनीच्या सात बारा वर शासनाचे नाव लावण्यात आले आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही प्रस्ताव सादर न केल्याने आता ह्या जमिनींचा प्रस्त्यक्ष ताबा घेऊन लिलाव पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार हेमलता बडे यांनी दिली.